पुणेकरांनो सावधान! शहरात पावसाची विश्रांती; मात्र ‘या’ भागांसाठी ऑरेंज अलर्ट

पुणे : पुणे शहरासह उपनगरांमध्ये गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला, तरी हवामान विभागाने पुढील दोन दिवसांसाठी महत्त्वाचा अंदाज वर्तवला आहे.
शहरात मुख्यतः ढगाळ वातावरण राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मात्र, पुणे जिल्ह्यातील घाट परिसरासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला असून काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, मोसमी वाऱ्यांचा प्रभाव कमी झाल्याने पुणे शहरातील पावसाची तीव्रता घटली आहे. गेल्या दोन दिवसांत शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्ये अधूनमधून हलक्या सरी कोसळल्या, तर दिवसभर ढगाळ वातावरण कायम राहिले.


बुधवारी सकाळी पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, दुपारी सुमारे चारच्या सुमारास अवघ्या 5 ते 10 मिनिटांच्या जोरदार सरींमुळे काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले.
घाट परिसरात जाणाऱ्यांसाठी विशेष इशारा
शहरात पावसाचा जोर कमी असला, तरी मावळ, लोनावळा, लवासा आणि घाटमाथा परिसरात पुढील दोन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. यामुळे हवामान विभागाने घाट भागासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
विकेंडला फिरायला जाण्याचा विचार करणाऱ्या पर्यटकांनी हवामानाचा अंदाज तपासूनच प्रवास करावा, तसेच घाट रस्त्यांवर आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.