मोठी बातमी! MPSC गट-क परीक्षेच्या अर्जाची मुदत वाढली; आता ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

मुंबई : सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 साठी ऑनलाइन अर्ज करण्याच्या अंतिम मुदतीत वाढ केली आहे. तांत्रिक अडचणी किंवा इतर कारणांमुळे अर्ज सादर करू न शकलेल्या उमेदवारांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
यापूर्वी अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 ऑगस्ट 2026 होती. मात्र, उमेदवारांकडून आलेल्या मागण्या आणि ऑनलाइन प्रक्रियेदरम्यान आलेल्या तांत्रिक अडचणींची दखल घेत आयोगाने मुदतवाढ जाहीर केली आहे. आता इच्छुक उमेदवार 10 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकणार आहेत.

अर्जासोबत भरावयाच्या परीक्षा शुल्कासाठीही आयोगाने स्वतंत्र मुदतवाढ दिली आहे. उमेदवारांना 13 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत ऑनलाइन परीक्षा शुल्क भरता येणार आहे.


यंदा गट-क संवर्गातील विविध शासकीय विभागांमधील एकूण 5,707 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यामध्ये सर्वाधिक चर्चेत असलेली तलाठीची 1,539 पदे भरली जाणार असल्याने या भरतीकडे लाखो उमेदवारांचे लक्ष लागले आहे.
‘My Account’ मधून माहिती अद्ययावत करा
आयोगाने उमेदवारांना अर्जातील माहिती आणि आवश्यक कागदपत्रांबाबतही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. अर्ज सादर केल्यानंतर काही माहिती अपूर्ण राहिली असल्यास किंवा कागदपत्रे अपलोड करायची असल्यास mpsconline.gov.in वरील ‘My Account’ विभागातून संबंधित परीक्षेसमोरील पर्याय निवडून आवश्यक माहिती व कागदपत्रे अपलोड करता येतील. अर्जात नमूद केलेल्या दाव्यांशी संबंधित प्रमाणपत्रे वेळेत सादर करणे बंधनकारक असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, अंतिम दिवशी संकेतस्थळावर ताण वाढण्याची शक्यता लक्षात घेता, अर्ज आणि परीक्षा शुल्क भरण्याची प्रक्रिया शेवटच्या क्षणापर्यंत पुढे ढकलू नये, असे आवाहन MPSC कडून करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी MPSCच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी.