‘धनुष्यबाण’वर उद्धव ठाकरेंचा मोठा विश्वास! “चिन्ह मिळेल, नाहीतर गोठेल”; 2029 मिशनसाठी पदाधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश

मुंबई : शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्हावरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी निर्णायक टप्प्यात पोहोचली असताना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांसमोर मोठा विश्वास व्यक्त केला आहे. शिवसेना भवनात जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख आणि विधानसभा प्रमुखांच्या ऑनलाइन बैठकीत त्यांनी पक्षाच्या आगामी रणनीतीचा आढावा घेतला. यावेळी सर्वोच्च न्यायालयाकडून पक्षाला न्याय मिळेल, असा विश्वास व्यक्त करत, ‘धनुष्यबाण’ चिन्ह आपल्यालाच मिळेल, अन्यथा ते कोणालाही न देता गोठवले जाईल, असे वक्तव्य त्यांनी केल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.
बैठकीत पक्षसंघटन मजबूत करण्यावर विशेष भर देण्यात आला. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि त्यानंतरच्या लोकसभा-विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन प्रत्येक पदाधिकाऱ्याने सक्रियपणे कामाला लागावे, असे निर्देश उद्धव ठाकरे यांनी दिले. विशेषतः 2029 च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आतापासूनच संघटन विस्तार, नव्या कार्यकर्त्यांची नोंदणी आणि गावपातळीवर पक्षाची ताकद वाढवण्याचे आदेश त्यांनी दिल्याची माहिती आहे.

बैठकीदरम्यान उद्धव ठाकरे यांनी कामात निष्क्रिय असलेल्या पदाधिकाऱ्यांनाही स्पष्ट शब्दांत इशारा दिला. “ज्यांना जबाबदारी पार पाडता येत नसेल त्यांनी पद सोडावे. अशा पदाधिकाऱ्यांना दुसरी जबाबदारी दिली जाईल, मात्र पक्षाचे काम ठप्प राहू देणार नाही,” असा संदेश त्यांनी दिल्याचे सांगितले जाते.


यावेळी SIR नोंदणी मोहिमेचाही विशेष आढावा घेण्यात आला. 8 ऑगस्टपर्यंत प्रत्येक पात्र नागरिकाची नोंदणी पूर्ण व्हावी आणि कोणत्याही पात्र मतदाराचे नाव यादीतून वगळले जाणार नाही, यासाठी पदाधिकाऱ्यांनी स्थानिक पातळीवर सक्रिय भूमिका घ्यावी, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या. मतदार नोंदणी प्रक्रियेत कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी पक्ष यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले.
बैठकीत नीट पेपरफुटी प्रकरणाचाही उल्लेख झाला. या प्रकरणामुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांची सरकारने माफी मागावी, तसेच आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जबद्दलही सरकारने दिलगिरी व्यक्त करावी, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडल्याची माहिती आहे.
दरम्यान, 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हावरून सुरू झालेला वाद अद्याप सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह देण्याचा निर्णय घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. गेल्या चार वर्षांपासून या प्रकरणाची सुनावणी सुरू असून आता अंतिम निर्णयाकडे राज्याच्या राजकारणाचे लक्ष लागले आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा केवळ पक्षचिन्हापुरता मर्यादित राहणार नसून महाराष्ट्रातील शिवसेनेच्या भविष्यातील राजकीय समीकरणांवरही त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या बैठकीतील संदेशाला आगामी राजकीय घडामोडींच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहे.