दौंड पोलीस ठाण्यावर मोर्चा! पोलीस आमदारांच्या दबावाखाली काम करतात; माजी आमदार रमेश थोरात यांचा आरोप

दौंड : दौंडमध्ये सध्या सत्तेचा प्रचंड गैरवापर सुरू आहे. खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण वाढले आहे, अन्याय करणाऱ्या आणि गुन्हेगारी आरोपींना न्यायालयाचे आदेश येऊनही अटक केली जात असून, पोलिसांवर सत्ताधारी आमदार राहुल कुल यांचा प्रचंड दबाव आहे. असा खळबळजनक आरोप माजी आमदार रमेश थोरात यांनी केला.

तसेच दौंडच्या माजी नगराध्यक्षांच्या कुटुंबावर २० ऑक्टोबर २०२२ रोजी जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. यावेळी महिलांचा विनयभंग ही करण्यात आल्याची तक्रार दौंड पोलीसांकडे करण्यात आली होती.
मात्र दौंड पोलिसांनी तक्रार दाखल न केल्याने पिढीतांनी दौंड न्यायालयात धाव घेतली. सहा महिन्यांनंतर न्यायालयाने वीस आरोपींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दौंड पोलिसांना दिले. त्यानंतर गुन्हे दाखल होऊनही अद्याप आरोपींना अटक केली गेली नाही. याच्या निषेधार्थ शुक्रवारी ( ता. १९) दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांच्या नेतृत्वाखाली दौंड पोलीस ठाण्यावर सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला.

यावेळी उपस्थित आंदोलकांना मार्गदर्शन करताना रमेश थोरात म्हणाले की, बादशाह शेख यांच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला करण्यात आला,. शहरातील वीस जणांवर कोर्टाच्या आदेशाने जीवघेणे हल्ला करणे व विनयभंगाचा गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र संबंधित संशयित आरोपींना अटक ही केले जात नाही.
पोलिसांच्या या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पोलीस प्रशासनाने असे प्रकार त्वरित थांबवावेत आणि विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपींना त्वरित अटक करावी, अन्यथा भविष्यात यापेक्षा दहा पट मोठा मोर्चा काढण्यात येईल असा इशारा ही माजी आमदार थोरात यांनी यावेळी बोलताना पोलीस प्रशासनाला दिला.