रेशन कार्डधारकांसाठी मोठी खुशखबर! 15 ऑगस्टपासून QR स्मार्ट कार्डची सुरुवात; ‘या’ 1.86 कोटी कुटुंबांना मिळणार थेट लाभ

मुंबई : राज्यातील कोट्यवधी रेशन कार्डधारकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून, 15 ऑगस्टपासून QR Code आधारित स्मार्ट शिधापत्रिका वितरण मोहिमेला अधिकृत सुरुवात होणार आहे. सार्वजनिक वितरण प्रणाली अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि पूर्णपणे डिजिटल करण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प राबवला जात आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील 1 कोटी 86 लाख पिवळ्या आणि केसरी शिधापत्रिकांचे स्मार्ट कार्डमध्ये रूपांतर करण्यात येणार असून, पात्र लाभार्थ्यांना ही कार्डे पूर्णपणे मोफत दिली जाणार आहेत.
राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. सुरुवातीला गडचिरोली आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक स्वरूपात स्मार्ट शिधापत्रिका वाटप सुरू होईल. या टप्प्यातील अनुभव आणि तांत्रिक बाबींचा आढावा घेतल्यानंतर राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने ही मोहीम राबवली जाणार आहे. 26 जानेवारीपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात स्मार्ट शिधापत्रिका वितरण पूर्ण करण्याचे नियोजन विभागाने केले आहे.

सध्या वापरात असलेल्या कागदी शिधापत्रिका अनेकदा फाटणे, खराब होणे, हरवणे किंवा त्यावरील माहिती अस्पष्ट होणे अशा समस्यांमुळे लाभार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. नवीन QR स्मार्ट शिधापत्रिकेमुळे हा त्रास संपुष्टात येणार असून लाभार्थ्यांची संपूर्ण माहिती डिजिटल स्वरूपात सुरक्षित राहणार आहे. त्यामुळे रेशन वितरण अधिक वेगवान, अचूक आणि पारदर्शक होण्यास मदत होणार आहे.


या उपक्रमाचा लाभ राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना (NFSA) तसेच एपीएल शेतकरी योजनेतील पात्र लाभार्थ्यांना मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात अंत्योदय अन्न योजनेतील सुमारे 25 लाख शिधापत्रिकाधारक आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील 1 कोटी 61 लाख लाभार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, पांढऱ्या शिधापत्रिकाधारकांना सध्या या योजनेत समाविष्ट करण्यात आलेले नाही.
स्मार्ट शिधापत्रिका तयार करताना लाभार्थ्यांचे आधार क्रमांकाशी संलग्नीकरण केले जाणार असून फेस ऑथेंटिकेशनची सुविधाही उपलब्ध असेल. त्यामुळे बनावट लाभार्थ्यांवर नियंत्रण ठेवणे, डुप्लिकेट नोंदी रोखणे आणि योग्य व्यक्तीपर्यंतच शासकीय धान्य पोहोचवणे अधिक सोपे होणार आहे.
विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मोहीम 15 ऑगस्टपासून सुरू होऊन 26 जानेवारीपर्यंत टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जाणार आहे. जिल्हानिहाय वेळापत्रक जाहीर करून लाभार्थ्यांना स्मार्ट कार्डचे वितरण केले जाईल.
विशेष म्हणजे, या डिजिटल शिधापत्रिका प्रकल्पाची संकल्पना स्वर्गीय अजितदादा पवार यांनी मांडली होती. जुन्या कागदी शिधापत्रिकांमुळे सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रास दूर करून आधुनिक, सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी व्यवस्था उभी करण्याचा त्यांचा विचार आता प्रत्यक्षात साकार होत आहे.
या नव्या व्यवस्थेमुळे रेशन वितरणातील गैरव्यवहारांना आळा बसण्याबरोबरच लाभार्थ्यांना अधिक विश्वासार्ह, सुलभ आणि तंत्रज्ञानाधारित सेवा मिळणार असल्याने राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेत मोठा बदल घडणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.