प्रेमासाठी पतीचा ‘गेम’ संपवला! शेतात बोलावून गळा आवळला; मृतदेह झाडाखाली फेकला, पत्नी-प्रियकराचा थरार काही तासांत उघड

वाशिम : वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील वाकळवाडी शेतशिवारात उघडकीस आलेल्या एका हत्येने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. संशयास्पद मृत्यू म्हणून समोर आलेल्या सुरेश राजाराम चळके यांच्या प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या काही तासांत छडा लावत पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली. अनैतिक संबंधांमध्ये पती अडथळा ठरत असल्याने त्याचा काटा काढण्यासाठी पत्नीने प्रियकरासोबत थंड डोक्याने कट रचल्याचे तपासात समोर आले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, अमानी गावचे रहिवासी सुरेश चळके हे पत्नी आशासह वाकळवाडी येथे तिच्या माहेरी राहत होते. याच काळात आशाचे गावातील महादेव बजरंग आंभोरे याच्याशी प्रेमसंबंध जुळले. काही दिवसांनी या संबंधांची माहिती सुरेश यांना मिळाली. त्यांनी पत्नीला याबाबत जाब विचारत संबंध तोडण्यास सांगितले. यामुळे घरात सातत्याने वाद सुरू होते. अखेर पतीच आपल्या नात्यातील सर्वात मोठा अडथळा असल्याचा निष्कर्ष काढत आशा आणि महादेव यांनी त्याच्या हत्येचा कट रचला.

२९ जुलै रोजी आशाने सुरेश यांना शेतात येण्यास सांगितले. तिच्या बोलावण्यावर विश्वास ठेवून सुरेश शेतात पोहोचले. मात्र तेथे आधीपासून दबा धरून बसलेला महादेव त्यांची वाट पाहत होता. दोघांनी मिळून सुरेश यांचा गळा आवळून खून केला. त्यानंतर गुन्ह्याचे पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह शेतातील लिंबाच्या झाडाखाली टाकून दोघेही पसार झाले.


दरम्यान, शेतात मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच मेडशी पोलीस चौकी आणि मालेगाव पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला. वैद्यकीय तपासणीत गळा आवळल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने हलवली. घटनास्थळावरील पुरावे, तांत्रिक माहिती आणि संशयितांच्या हालचालींचा मागोवा घेत पोलिसांनी अवघ्या काही तासांत आशा चळके आणि महादेव आंभोरे यांना ताब्यात घेतले.
कडक चौकशीदरम्यान दोघांनीही खुनाची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर दोघांविरुद्ध मालेगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.
पोलीस निरीक्षक राजेश खेरडे यांनी सांगितले की, २९ जुलै रोजी दुपारी वाकळवाडी शेतशिवारात सुरेश चळके यांचा मृतदेह आढळला होता. प्राथमिक तपासात गळा आवळल्याचे दिसून आले. पुढील तपासात पत्नी आणि तिच्या प्रियकराने मिळून खून केल्याचे निष्पन्न झाले. दोघांना अटक करण्यात आली असून या गुन्ह्यामागील इतर पैलूंचाही तपास सुरू आहे.
प्रेमसंबंधासाठी पतीचा जीव घेतल्याच्या या धक्कादायक घटनेमुळे वाशिम जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून, कौटुंबिक वादाचे हे प्रकरण थेट नियोजित हत्येत रूपांतर झाल्याने नागरिकांमध्येही संताप व्यक्त केला जात आहे.