रात्रभर बैठका अन् पहाटेच सरकारी रुग्णालयात धडक! बीडमध्ये सुनेत्रा पवारांनी प्रशासनाला दिला स्पष्ट इशारा

बीड : बीड जिल्ह्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यात उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी विकासकामे, प्रशासन आणि आरोग्य व्यवस्थेचा घेतलेला धडाकेबाज आढावा सध्या जिल्हाभर चर्चेचा विषय ठरला आहे. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत विविध विभागांच्या बैठका घेतल्यानंतर शुक्रवारी सकाळी नेमके सात वाजता त्यांनी जिल्हा रुग्णालयात अचानक पोहोचत आरोग्य व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी केली. सलग बैठका आणि पहाटेच्या अचानक भेटीमुळे प्रशासनात चांगलीच खळबळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
दौऱ्याच्या पहिल्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात वरिष्ठ अधिकारी, विविध विभागांचे प्रमुख आणि लोकप्रतिनिधींसोबत विकासकामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्ह्यात सुरू असलेल्या रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, सिंचन आणि इतर पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेताना प्रत्येक कामाची सद्यस्थिती जाणून घेण्यात आली. रखडलेली कामे, निधीची उपलब्धता, प्रशासकीय अडचणी आणि नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारी यावरही सविस्तर चर्चा झाली. प्रत्येक विभागाने ठरलेल्या वेळेत काम पूर्ण करण्यासाठी नियोजन करावे, अशा सूचना देण्यात आल्याचे समजते.

बैठका रात्री उशिरापर्यंत सुरू राहिल्या. जवळपास अकरा वाजेपर्यंत अधिकाऱ्यांकडून विविध योजनांची माहिती घेण्यात आली. केवळ कागदोपत्री आढावा न घेता प्रत्यक्ष अंमलबजावणीवर भर देण्याच्या सूचना देत नागरिकांना विकासकामांचा लाभ वेळेत मिळाला पाहिजे, यावर सुनेत्रा पवार यांनी विशेष भर दिल्याचे सांगितले जात आहे.


रात्री उशिरापर्यंत बैठका झाल्यानंतरही दुसऱ्याच दिवशी सकाळी सात वाजता त्यांनी जिल्हा रुग्णालयात अचानक भेट दिली. कोणतीही पूर्वकल्पना नसताना झालेल्या या पाहणीमुळे रुग्णालय प्रशासनाची धावपळ उडाली. रुग्णालयातील विविध वॉर्ड, उपचार व्यवस्था, स्वच्छता, औषधांचा साठा, वैद्यकीय उपकरणे, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती तसेच सुरू असलेल्या विकासकामांची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी उपचारासाठी आलेल्या रुग्णांशी आणि त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधून त्यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या. आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबवाव्यात, उपचारात कोणताही विलंब होऊ नये आणि प्रलंबित कामे निश्चित मुदतीत पूर्ण करावीत, असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः बीडचे पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील अनेक विकासकामांना गती मिळाली होती. विविध प्रकल्पांसाठी निधी मंजूर करून प्रशासनाला वेगाने काम करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यांच्या निधनानंतर विकासाची ही गती कायम राहणार का, अशी चर्चा सुरू असतानाच सुनेत्रा पवार यांनी दौऱ्यात दाखवलेल्या कार्यपद्धतीमुळे प्रशासनावर थेट देखरेख ठेवली जाणार असल्याचा स्पष्ट संदेश गेल्याचे मानले जात आहे.
सलग बैठका, पहाटेची अचानक पाहणी, अधिकाऱ्यांना दिलेल्या सूचना आणि विकासकामांच्या अंमलबजावणीवर दिलेला भर यामुळे बीड जिल्ह्यातील प्रशासन अधिक जबाबदारीने काम करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आता राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात रंगू लागली आहे.