तक्रारदार महिला परतीची विनंती करत राहिली, पण… साताऱ्यात पुणे पोलिसांचा धक्कादायक प्रताप; तिघांवर कारवाई

पुणे : कौटुंबिक हिंसाचाराच्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी गेलेल्या पुणे पोलिसांचा अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तपासासाठी तक्रारदार महिलेला सोबत घेऊन साताऱ्यात गेलेल्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावण्याऐवजी ढाब्यावर थांबून मौजमजा केली आणि त्यानंतर पर्यटनस्थळांनाही भेट दिल्याचा गंभीर आरोप सिद्ध झाला आहे. या प्रकाराची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेत तिन्ही कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली आहे.
विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या कौटुंबिक हिंसाचाराच्या गुन्ह्याच्या तपासासाठी 4 एप्रिल रोजी तीन पोलीस कर्मचारी तक्रारदार महिलेला घेऊन साताऱ्यात गेले होते. नियमानुसार स्थानिक पोलिसांच्या मदतीने तपास करणे अपेक्षित असताना त्यांनी साताऱ्यात पोहोचल्यानंतर एका प्रसिद्ध ढाब्यावर वेळ घालवला. त्यानंतर शाहूपुरी पोलीस ठाण्यात हजेरी लावून तपासाची केवळ औपचारिकता पूर्ण केली.

तपासादरम्यान घटनास्थळी स्थानिक नागरिक किंवा संबंधित व्यक्तींची सखोल चौकशीही करण्यात आली नाही. त्याऐवजी हे कर्मचारी कास पठारासह इतर पर्यटनस्थळांवर फिरल्याचे चौकशीत समोर आले.


या संपूर्ण काळात तक्रारदार महिला मानसिक तणावाखाली होती. तिच्या घरी गंभीर आजारी रुग्ण असल्याने तिने वारंवार पुण्यात लवकर परतण्याची विनंती केली. मात्र, पोलिसांनी तिच्या विनंतीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे.
इतकेच नव्हे, तर पुण्यात परतताना हे कर्मचारी एका सहकाऱ्याच्या घरी जेवणासाठी थांबले. रात्री उशिरा पुण्यात आल्यानंतरही तक्रारदार महिलेला तिच्या घरी सोडण्याऐवजी आधी स्वारगेट येथे उतरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. महिलेच्या आग्रहानंतर अखेर मध्यरात्रीच्या सुमारास तिला नारायण पेठ पोलीस चौकीत सोडण्यात आले.
या प्रकरणाची अंतर्गत चौकशी करण्यात आली असता तिन्ही कर्मचारी दोषी आढळले. त्यानंतर अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांनी तिन्ही कर्मचाऱ्यांची दोन वर्षांची वेतनवाढ रोखण्याची शिक्षा सुनावली आहे. या कारवाईमुळे पुणे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली असून कर्तव्यात हलगर्जीपणा करणाऱ्यांना स्पष्ट इशारा मिळाला आहे.