मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना कोर्टाचे समन्स; 5 ऑगस्टला हजर राहण्याचे आदेश, काय आहे नेमकं प्रकरण?

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कल्याण न्यायालयाने समन्स बजावले आहे. 2009 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान घडलेल्या वसंत डावखरे प्रकरणात न्यायालयाने ठाकरे यांना 5 ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
या समन्सनंतर उद्धव ठाकरे स्वतः न्यायालयात उपस्थित राहणार की त्यांच्या वकिलामार्फत बाजू मांडणार, याकडे राजकीय वर्तुळासह सर्वांचे लक्ष लागले आहे. हे प्रकरण 2009 च्या कल्याण लोकसभा निवडणुकीशी संबंधित आहे.

त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार वसंत डावखरे यांच्या विरोधात शिवसेनेचे उमेदवार आनंद परांजपे मैदानात होते. प्रचारादरम्यान उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या सभेत वसंत डावखरे यांचा कथित व्हिडिओ दाखवण्यात आला होता. या व्हिडिओमध्ये डावखरे कार्यकर्त्यांना निवडणूक जिंकण्यासाठी पोलिस आणि निवडणूक अधिकाऱ्यांची भीती न बाळगण्याचे आवाहन करत असल्याचा दावा करण्यात आला होता.


मात्र, वसंत डावखरे यांनी हा व्हिडिओ आपला नसल्याचा दावा करत तो मॉर्फ आणि एडिट करून बदनामी करण्यासाठी वापरण्यात आल्याचा आरोप केला होता. त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, आनंद परांजपे आणि रमाकांत देवळेकर यांच्याविरोधात न्यायालयात खटला दाखल केला होता.
दरम्यान, या प्रकरणातील मूळ तक्रारदार वसंत डावखरे यांचे निधन झाले आहे. त्यामुळे आता न्यायालयीन प्रक्रियेत पुढे काय घडणार, तसेच उद्धव ठाकरे यांची भूमिका काय असेल, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
या प्रकरणी डावखरे कुटुंबीयांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.आता 5 ऑगस्ट रोजीच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले असून, त्या दिवशी या प्रकरणाची पुढील दिशा स्पष्ट होण्याची शक्यता आहे.