‘विद्यार्थ्यांवर लाठीमार, महाराष्ट्र पेटणार?’ प्रकाश आंबेडकरांची २३ जुलैला राज्यव्यापी बंदची घोषणा


मुंबई : दिल्लीत विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या कथित पोलिस लाठीचार्जचे पडसाद आता महाराष्ट्रातही उमटू लागले आहेत. या घटनेचा निषेध करत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी २३ जुलै रोजी राज्यव्यापी महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी उभे राहत राज्यातील सर्व समविचारी पक्ष, विद्यार्थी संघटना, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी या बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

दिल्लीत विविध शैक्षणिक मागण्यांसाठी आणि भविष्यासंदर्भातील प्रश्न उपस्थित करत विद्यार्थी शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होते. मात्र आंदोलनादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कारवाईत अनेक विद्यार्थ्यांना दुखापत झाल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला असून, या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. विरोधी पक्षांनीही या घटनेवर केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वी दिल्लीतील जंतर-मंतर येथे जाऊन आंदोलनकर्ते अभिजीत दिपके यांची भेट घेतली होती. या भेटीत विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पूर्ण पाठिंबा देत, न्याय मिळेपर्यंत संघर्षात सोबत राहण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

दुसरीकडे, या मुद्द्यावरून संसद आणि राष्ट्रीय राजकारणही तापले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत विद्यार्थ्यांवरील कारवाईवर चर्चा व्हावी, यासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. त्यानंतर राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, प्रियांका गांधी, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, जयराम रमेश यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलनासाठी पोहोचले. विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील, अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे.

या आंदोलनादरम्यान केंद्र सरकारने संवादाचा मार्ग स्वीकारत केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांना आंदोलनकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी पाठवल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, अद्याप कोणताही ठोस निर्णय किंवा तोडगा जाहीर झालेला नाही.

दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केलेल्या २३ जुलैच्या महाराष्ट्र बंदमुळे राज्यातील वाहतूक, व्यापारी व्यवहार आणि विविध सेवा यावर काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बंदला किती राजकीय पक्ष, संघटना आणि नागरिकांचा प्रतिसाद मिळतो, तसेच विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर केंद्र सरकार पुढे काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!