‘IPS ट्रेनी महिला माझ्यावर संबंधांसाठी दबाव टाकायची’; सुसाइड नोटमधील दाव्याने खळबळ, लैंगिक अत्याचाराच्या आरोपांनंतर उदय रेड्डींचे टोकाचे पाऊल


हैदराबाद : राष्ट्रीय पोलीस अकादमी (NPA) येथील दोन ट्रेनी आयपीएस अधिकाऱ्यांमधील वादाने आता अत्यंत गंभीर स्वरूप धारण केले आहे. एका महिला प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकाऱ्याने सहकारी अधिकारी उदय कृष्ण रेड्डी यांच्यावर लैंगिक अत्याचार, मारहाण, धमकी आणि मानसिक छळाचे आरोप करत गुन्हा दाखल केला. या प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच उदय रेड्डी यांनी कथितरित्या विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने संपूर्ण देशाचे लक्ष या घटनेकडे वेधले गेले आहे.

अट्टापूर पोलीस ठाण्यात महिला अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतर उदय रेड्डी हे रविवारी एका मित्राच्या घरी गेले. तेथे त्यांनी विषारी पदार्थ प्राशन केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना तातडीने एसआर नगरमधील जयंती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या घटनेचा स्वतंत्र तपास सुरू केला असून आत्महत्येच्या प्रयत्नामागील नेमके कारण शोधले जात आहे.

दरम्यान, उदय रेड्डी यांनी लिहिल्याचे सांगितल्या जाणाऱ्या सुसाइड नोटमुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. त्या पत्रात त्यांनी स्वतःवरील सर्व आरोप फेटाळून लावत संबंधित महिला अधिकारी आणि माझ्यात परस्पर संमतीने प्रेमसंबंध होते, असा दावा केला आहे. तिचे लग्न झाल्यानंतरही ती संबंध कायम ठेवण्यासाठी माझ्यावर दबाव टाकत होती. मी नकार दिल्यानंतर माझ्याविरोधात खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या पत्रातील दाव्यांची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.

दुसरीकडे, महिला अधिकाऱ्याने आपल्या तक्रारीत अत्यंत गंभीर आरोप नोंदवले आहेत. तिच्या म्हणण्यानुसार, उदय रेड्डी यांनी तिच्यावर शारीरिक अत्याचार केला, केस ओढले, गळा दाबण्याचा प्रयत्न केला, चाकूचा धाक दाखवला आणि तिचे खासगी व्हिडिओ चित्रीत करून ते पतीला पाठवण्याची धमकी दिली. याशिवाय व्हॉट्सॲपवर आक्षेपार्ह संदेश पाठवणे, सहकारी अधिकाऱ्यांसमोर अपमान करणे आणि १० जुलै रोजी तिच्या खोलीत परवानगीशिवाय प्रवेश करून मारहाण केल्याचाही आरोप तिने केला आहे.

या घटनेनंतर सोशल मीडियावर उदय रेड्डी यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा सुरू असली तरी त्याबाबत पोलिसांनी अद्याप अधिकृत दुजोरा दिलेला नाही. एकीकडे महिला अधिकाऱ्याचे गंभीर आरोप, तर दुसरीकडे उदय रेड्डी यांचा प्रतिदावा असल्याने या प्रकरणातील सत्य तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

विशेष म्हणजे, उदय कृष्ण रेड्डी यांचा आयपीएस अधिकारी होण्याचा प्रवास संघर्षमय होता. ते पूर्वी पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते. त्यानंतर यूपीएससीची तयारी करत २०२३ मध्ये अखिल भारतीय क्रमवारीत ७८० वा क्रमांक मिळवत त्यांनी आयपीएस सेवेत प्रवेश मिळवला. मात्र आता त्यांच्यावरील गंभीर आरोप, त्यानंतरचा आत्महत्येचा प्रयत्न आणि समोर आलेली सुसाइड नोट यामुळे हे प्रकरण देशभर चर्चेचा विषय बनले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!