सायबर गुन्हेगारांना बँक खाते देणाऱ्यांनो सावधान! थेट गुन्हा दाखल; लोणी काळभोर पोलिसांची मोठी कारवाई

लोणी काळभोर : सायबर फसवणुकीसाठी बँक खाते उघडून त्यामार्फत फसवणुकीची रक्कम स्वीकारून ती इतरत्र हस्तांतरित केल्याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांच्या सायबर विभागाने अॅक्सिस बँकेच्या एका खात्याविरोधात भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे सायबर गुन्हेगारांना आर्थिक मदत करणाऱ्या ‘म्युल अकाऊंट’ धारकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारल्याचे स्पष्ट झाले आहे.
याप्रकरणी सायबर विभाग, लोणी काळभोर पोलीस ठाणेचे पोलीस शिपाई योगेश सुभाष पाटील यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. त्यानुसार ॲक्सिस बँकेतील खाते क्रमांक 924010045569568 संबंधित खातेधारकाविरोधात तंत्रज्ञान कायदा कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ ते २५ एप्रिल या कालावधीत संबंधित खाते सायबर फसवणुकीसाठी वापरण्यात आले. या खात्यावर १० हजार रुपयांची फसवणुकीची रक्कम जमा करून ती पुढे हस्तांतरित करण्यात आली. या व्यवहारामुळे देशातील एका नागरिकाची आर्थिक फसवणूक झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

सायबर तपासादरम्यान संबंधित बँक खाते फसवणुकीच्या व्यवहारासाठी वापरल्याचे स्पष्ट झाल्यानंतर २० जुलै रोजी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक (गुन्हे) नंदकुमार कोळी करीत आहेत.


वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीपकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ नाळ यांच्या देखरेखीखाली ही कारवाई करण्यात आली असून, सायबर फसवणुकीसाठी स्वतःचे बँक खाते उपलब्ध करून देणाऱ्या किंवा वापरणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा लोणी काळभोर पोलिसांनी दिला आहे.
