“व्यसनाला ठाम नकार द्या, सायबर गुन्ह्यांपासून सावध राहा!” – पोलीस उपनिरीक्षक अनुराधा मेहेर


लोणी काळभोर : “अमली पदार्थांचे व्यसन हे केवळ व्यक्तीचे आरोग्यच उद्ध्वस्त करत नाही, तर त्याचे भविष्य आणि संपूर्ण कुटुंबही संकटात ढकलते. त्यामुळे युवकांनी कोणत्याही प्रकारच्या व्यसनापासून दूर राहून निरोगी आणि जबाबदार जीवन जगावे,” असे आवाहन लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक अनुराधा मेहेर यांनी केले. यांतुन त्यांनी विद्यार्थ्यांना व्यसनाधीनतेच्या गंभीर परिणामांची जाणीव करून दिली.

राष्ट्रीय सेवा योजना आणि लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या संयुक्त विद्यमाने समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालयात मंगळवारी “अमली पदार्थविरोधी जनजागृती, सायबर सुरक्षा व महिला सुरक्षा” या विषयावरील प्रबोधनपर मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्ती, सायबर सुरक्षितता आणि महिला सन्मानाची शपथ घेत कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

यावेळी ठाणे अंमलदार उषा थोरात यांनी सायबर गुन्ह्यांबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. ऑनलाइन फसवणूक, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, मजबूत पासवर्ड, फिशिंग कॉल्स आणि बनावट लिंकपासून सावध राहण्यासाठी आवश्यक खबरदारी त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केली. तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी उपलब्ध असलेल्या कायदेशीर संरक्षणाची माहिती देत १०० व ११२ या हेल्पलाईन क्रमांकांचा उपयोग करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार घोडके होते. त्यांनी अमली पदार्थविरोधी जनजागृती, सायबर सुरक्षेचे महत्त्व आणि महिला सुरक्षेच्या संदर्भात विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. उपस्थित विद्यार्थ्यांनी सायबर गुन्ह्यांपासून स्वतःला दूर ठेवण्याची, व्यसनमुक्त समाज उभारण्यासाठी योगदान देण्याची आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी जागरूक नागरिक म्हणून वागण्याची शपथ घेतली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रमाधिकारी डॉ. शिवाजी गायकवाड यांनी केले, तर राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. गीतांजली चव्हाण यांनी आभार मानले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित, सजग आणि जबाबदार नागरिकत्वाची नवी जाणीव निर्माण झाल्याचे समाधान आयोजकांनी व्यक्त केले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!