कोल्हापूर हादरलं! अंबाबाई मंदिरातील 1,200 वर्षे जुन्या कारंज्याचे दगड चोरीला; ऐतिहासिक वारशावर डल्ला

कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंदिर परिसरातील सुमारे 1,200 वर्षे जुन्या कारंज्याच्या रचनेतील दगड अज्ञातांनी काढून नेल्याचा आरोप करण्यात आला असून या घटनेमुळे भाविक आणि वारसा संवर्धनाबाबत काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास मंदिर परिसरातील प्राचीन कारंज्याच्या ढाच्यातील दगड काढून नेण्यात आले. या दगडांची चोरी झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला असून, संबंधित घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

अंबाबाई मंदिराचा मूळ ढाचा आणि कारंजे यांसारख्या प्राचीन वास्तूंमध्ये दख्खनच्या काळ्या बेसाल्ट खडकाचा वापर करण्यात आला आहे. हे दगड ऐतिहासिक, पुरातत्त्वीय आणि सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत मौल्यवान मानले जातात.

दरम्यान, अंबाबाई मंदिराच्या संरक्षणासंदर्भातील अंतिम अधिसूचना 15 दिवसांत जारी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने राज्य सरकारला दिले आहेत. न्यायालयाने मंदिराचा 1,200 वर्षांचा ऐतिहासिक व पुरातत्त्वीय वारसा जपणे ही शासनाची जबाबदारी असल्याचे स्पष्ट करत अधिसूचना विलंबाबाबत नाराजी व्यक्त केली.


या प्रकरणी पुढील सुनावणी 10 ऑगस्ट रोजी होणार असून, मंदिर संवर्धनासाठी प्रस्तावित 1,500 कोटी रुपयांच्या विकास आराखड्याच्या पार्श्वभूमीवर ही घटना अधिक गंभीर मानली जात आहे.
