पुणेकरांनो पाणी जपून वापरा! 23 जुलैला शहरातील अनेक भागांचा पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी..

पुणे : पुणेकरांसाठी महत्त्वाची सूचना आहे. निगडी येथील मुख्य जलवाहिनी स्थलांतराचे काम आणि होळकर जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युतविषयक देखभाल कामांमुळे गुरुवार, 23 जुलै रोजी शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागातील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.
या कामांमुळे बंडगार्डन पाणीपुरवठा विभागाअंतर्गत येणाऱ्या अनेक भागांमध्ये दिवसभर पाणी मिळणार नाही. यात म्हस्के वस्ती, गणेशनगर (बोपखेल), कळस, विमानतळ परिसर, खराडी, विश्रांतवाडीचा काही भाग आणि संजय पार्क परिसर यांचा समावेश आहे.

याशिवाय हरीगंगा टाकीवर अवलंबून असलेले अहिल्यानगर, सैनिकनगर, साप्रस, शांतीनगर, प्रतीकनगर, जाधवनगर, पंचशीलनगर तसेच चतुःशृंगी पाणीपुरवठा विभागातील खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड, दारूगोळा कारखाना, मुळा रोड आदी भागांनाही या बंदचा फटका बसणार आहे.

महापालिकेच्या माहितीनुसार, 23 जुलै रोजी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील, तर 24 जुलैच्या सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू होईल. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक तेवढे पाणी आधीच साठवून ठेवावे आणि पुढील दोन दिवस पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.


