‘पुण्यात मुलीला इंजिनिअरिंगला सोडलं… परतीच्या वाटेवर काळाने घात केला’; समृद्धी महामार्गावर एका कुटुंबाचा हृदयद्रावक अंत


वर्धा : इंजिनिअरिंगच्या शिक्षणासाठी मुलीला पुण्यात दाखल करून उज्ज्वल भविष्यासाठी आनंदाने परतीचा प्रवास सुरू केलेल्या एका कुटुंबावर नियतीने अवघ्या काही तासांतच घाला घातला. समृद्धी महामार्गावरील वर्धा जिल्ह्यातील विरुळ परिसरात झालेल्या भीषण अपघातात आई-वडील, त्यांची दुसरी मुलगी, कार चालक आणि मालवाहू वाहनाचा चालक अशा पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर मालवाहू वाहनातील क्लिनर गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे संपूर्ण वर्धा जिल्हा शोकसागरात बुडाला आहे.

माहितीनुसार, वर्धा जिल्ह्यातील सालोड-हिरापूर येथील राजेश टिपले यांचा परिवार दोन जुळ्या मुलींना घेऊन पुण्यात गेला होता. दोघींनीही इंजिनिअरिंग प्रवेशासाठी अर्ज केला होता. त्यापैकी एका मुलीला पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश निश्चित झाल्याने तिला तेथेच वसतिगृहात ठेवण्यात आले. कुटुंबातील इतर सदस्य दुसऱ्या मुलीसह वर्ध्याकडे परत निघाले. मात्र हा प्रवास त्यांचा शेवटचा ठरला.

रात्री उशिरा समृद्धी महामार्गावरील विरुळजवळ आधीच इथेनॉल वाहून नेणाऱ्या वाहनाचा अपघात झाल्यामुळे वाहतूक नियंत्रित पद्धतीने सुरू होती. याचदरम्यान भरधाव वेगाने येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारची पुढील मालवाहू वाहनाला जोरदार धडक बसली. धडकेचा आवाज इतका प्रचंड होता की कारचा पुढील भाग अक्षरशः चेंदामेंदा झाला आणि काही क्षणांतच कारने पेट घेतला.

आग एवढ्या वेगाने पसरली की कारमधील प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही वाहनचालकांनी मदतीचा प्रयत्न केला, मात्र आगीच्या तीव्रतेमुळे कोणालाही कारजवळ जाता आले नाही. अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र तोपर्यंत कारमधील चारही जणांचा होरपळून मृत्यू झाला होता.

या दुर्घटनेत राजेश आनंद टिपले (50), त्यांची पत्नी सुषमा राजेश टिपले (45), त्यांची 16 वर्षीय मुलगी जान्हवी टिपले आणि कार चालकाचा मृत्यू झाला. धडक झालेल्या मालवाहू वाहनाचा चालक अंकुश लक्ष्मण राऊत (31) याचाही जीव गेला, तर क्लिनर गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेनंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे बंद करण्यात आली. इथेनॉल सांडल्यामुळे आणखी मोठी दुर्घटना घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाने परिसर सुरक्षित केला. पुलगाव पोलीस, महामार्ग पोलीस आणि वर्धा पोलीस यांनी संयुक्तपणे बचावकार्य राबवले. जळालेल्या कारमधून मृतदेह बाहेर काढण्यासाठी वाहनाचे अवशेष कापावे लागल्याची माहितीही समोर आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!