प्रेम, विश्वासघात अन् थरारक कट! कल्याणमध्ये प्रियकराचा खून करून मृतदेह गोणीत लपवला; एका व्हॉईस मेसेजने उघड केलं संपूर्ण रहस्य

कल्याण : कल्याणच्या मलंग रोड परिसरातील नीलकंठ सोसायटीत उघडकीस आलेल्या एका खळबळजनक हत्याकांडाने शहर हादरले आहे. एका महिलेने आपल्या प्रियकराची निर्घृण हत्या केल्यानंतर मृतदेह गोणीत भरून बाथरूममध्ये लपवून ठेवला. इतकेच नव्हे तर मृतदेह लवकर कुजावा, रक्ताचे पुरावे नष्ट व्हावेत आणि दुर्गंधीमुळे कुणालाही संशय येऊ नये, यासाठी बाथरूमचा नळ सतत सुरू ठेवण्यात आल्याचा संशय तपासात व्यक्त केला जात आहे. मात्र, आरोपी महिलेच्या एका व्हॉईस मेसेजमुळे संपूर्ण कट उघडकीस आला आणि पोलिस तपासाला निर्णायक दिशा मिळाली.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून संबंधित फ्लॅटमधून तीव्र दुर्गंधी येत असल्याने सोसायटीतील रहिवाशांनी मानपाडा पोलिसांना माहिती दिली. पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा फ्लॅट बाहेरून बंद होता. दरवाजा उघडल्यानंतर घरात कोणीही नसल्याचे दिसून आले. मात्र बाथरूममध्ये ठेवलेल्या एका मोठ्या गोणीत सडलेल्या अवस्थेतील पुरुषाचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक तपासात मृताच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले.

तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, हत्या केल्यानंतर आरोपी महिलेने मृतदेह गोणीत भरून बाथरूममध्ये ठेवला. दररोज पाणी सुरू झाल्यावर ते थेट गोणीवर पडत राहील, अशी व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे मृतदेह लवकर कुजेल, रक्ताचे डाग वाहून जातील आणि पुरावे नष्ट होतील, असा तिचा कथित प्रयत्न असल्याचा पोलिसांचा संशय आहे. या संपूर्ण प्रकारामुळे तपास अधिकाऱ्यांनाही धक्का बसला आहे.

दरम्यान, घटना घडल्यानंतर आरोपी महिला कल्याणमधून निघून गेली. मात्र फरार झाल्यानंतर तिने घरमालकाला एक व्हॉईस मेसेज पाठवला. त्यामध्ये फ्लॅटच्या बाथरूममध्ये नळ सुरू असून आत मृतदेह असल्याची माहिती दिल्याचे समोर आले. हा मेसेज ऐकताच घरमालकाने तातडीने पोलिसांना कळवले. याच व्हॉईस मेसेजमुळे या थरारक गुन्ह्याचा उलगडा झाला.


मानपाडा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावरील सर्व पुरावे जप्त केले आहेत. आरोपी महिलेचा शोध घेण्यासाठी विशेष पथके पश्चिम बंगालमधील कोलकात्याकडे रवाना करण्यात आली आहेत. या हत्येमागे नेमके कारण काय होते, आर्थिक व्यवहार, वैयक्तिक वाद की प्रेमसंबंधातील मतभेद, याचा तपास सुरू असून या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही शोध पोलिस घेत आहेत. या धक्कादायक प्रकरणामुळे कल्याण परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
