आयुष्मान कार्ड आता व्हॉट्सॲपवर; ५ मिनिटांत मिळणार सुविधा, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

पुणे : केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतील लाभार्थ्यांसाठी मोठी सुविधा सुरू करण्यात आली आहे. आता आयुष्मान कार्ड काढण्यासाठी नागरिकांना सरकारी कार्यालये किंवा सीएससी केंद्रांच्या फेऱ्या मारण्याची गरज राहणार नाही. ‘आयुष्मान सारथी’ या अधिकृत व्हॉट्सॲप चॅटबॉटच्या माध्यमातून नागरिकांना घरबसल्या आयुष्मान कार्ड मिळवता येणार आहे. ही सुविधा २४ तास उपलब्ध असून, कार्ड मिळवण्याची प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल करण्यात आली आहे.

आयुष्मान कार्ड मिळवण्यासाठी नागरिकांनी सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये +91 72908 23838 हा अधिकृत ‘आयुष्मान सारथी’ क्रमांक सेव्ह करावा. त्यानंतर व्हॉट्सॲपवर या क्रमांकावर ‘Hi’ किंवा ‘Hello’ असा संदेश पाठवावा. चॅटबॉटकडून आलेल्या पर्यायांमध्ये ‘Create Ayushman Card’ किंवा ‘Download Ayushman Card’ हा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर आधार क्रमांक किंवा नोंदणीकृत मोबाईल क्रमांकाची माहिती भरावी लागेल. मोबाईलवर आलेला ओटीपी टाकून पडताळणी पूर्ण केल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येईल आणि कार्ड पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करता येणार आहे.
या व्हॉट्सॲप सुविधेमुळे नागरिकांना केवळ कार्ड मिळणार नाही, तर योजनेची पात्रता तपासणे, जवळच्या आयुष्मान योजनेशी जोडलेल्या रुग्णालयांची माहिती मिळवणे आणि उपचार किंवा कार्डशी संबंधित तक्रारी नोंदवणे अशा सुविधाही उपलब्ध होणार आहेत.

आयुष्मान भारत योजना ही देशातील गरीब, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू कुटुंबांसाठी सुरू करण्यात आली आहे. सामाजिक, आर्थिक आणि जात जनगणनेच्या (SECC) निकषांनुसार लाभार्थ्यांची निवड केली जाते. ग्रामीण भागातील कच्च्या घरात राहणारे कुटुंब, भूमिहीन शेतमजूर, अनुसूचित जाती-जमातीतील नागरिक, दिव्यांग सदस्य असलेली कुटुंबे तसेच असंघटित क्षेत्रातील कामगारांना या योजनेचा लाभ मिळू शकतो.

या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा दिली जाते. मात्र, सरकारी नोकरी, चारचाकी वाहन, पक्के घर किंवा कर भरणाऱ्या कुटुंबांना योजनेच्या पात्रतेतून वगळले जाऊ शकते. व्हॉट्सॲपवरील या नवीन सुविधेमुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य सेवांपर्यंत पोहोचणे अधिक सोपे होणार आहे.