“‘फक्त परदेशातच शारीरिक संबंध…’; गिरीजा राऊतांच्या तक्रारीतील धक्कादायक दावे, विनायक राऊतांच्या कुटुंबावर गुन्हा!”

ठाणे : ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार विनायक राऊत, त्यांचा मुलगा आणि मुंबई महापालिकेतील माजी नगरसेवक गितेश राऊत तसेच कुटुंबातील इतर सदस्यांविरोधात ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही तक्रार विनायक राऊत यांच्या सून गिरीजा राऊत यांनी दाखल केली असून, कौटुंबिक छळ, मानसिक अत्याचार तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गतही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणात एका कथित भोंदूबाबालाही अटक करण्यात आली आहे.

पोलीस तक्रारीत गिरीजा राऊत यांनी वैवाहिक आयुष्यातील अनेक धक्कादायक अनुभव मांडले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, लग्नानंतर हनिमूनसाठी ऊटी येथे सहा दिवस मुक्काम असूनही पती गितेश राऊत यांनी शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला. त्याबाबत विचारणा केल्यावर “मेंटल कनेक्शन महत्त्वाचे आहे, शारीरिक संबंधांना मी प्राधान्य देत नाही,” असे सांगत त्यांनी विषय टाळल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, पतीचे शारीरिक संबंधांविषयी विचित्र विचार होते. भारतात नव्हे तर केवळ परदेशातील ठिकाणीच शारीरिक संबंध ठेवण्यास आपण सहज असतो, असे ते सांगत असत. मुंबईतील घरी आईला आवाज ऐकू जाईल, तर मालवणमधील घरी इतरांना कळेल, अशी कारणे देत ते सातत्याने जवळीक टाळत असल्याचाही दावा गिरीजा राऊत यांनी केला आहे.

याशिवाय पती आपल्या मासिक पाळीच्या तारखा मोबाईलमध्ये नोंदवत असत, तर राजकीय कार्यक्रमांमध्ये अडथळा येऊ नये म्हणून सासू व पती यांनी वारंवार मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी औषधे घेण्यास भाग पाडल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. त्यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

गिरीजा राऊत यांनी मानसिक छळ, शिवीगाळ, सार्वजनिक ठिकाणी अपमान आणि सातत्याने दबाव टाकल्याचाही आरोप केला आहे. पतीच्या वागणुकीमुळे दोघांनी मानसोपचार तज्ज्ञ, सेक्सोलॉजिस्ट आणि स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घेतला. मात्र पती कोणत्याही उपचारांना सहकार्य करत नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
गर्भधारणेबाबत नैसर्गिक पर्याय उपलब्ध असतानाही फक्त आयव्हीएफ प्रक्रियेवरच आग्रह धरून, घरच्या घरी होम इन्सेमिनेशन करण्यासाठी दबाव आणण्यात आल्याचा गंभीर आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. विरोध केल्यावर शिवीगाळ व दमदाटी केल्याचे गिरीजा यांनी म्हटले आहे.
तसेच, सर्व वैद्यकीय उपचारांदरम्यान विनायक राऊत डॉक्टरांशी संपर्क साधून हस्तक्षेप करत असल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची पूर्वकल्पना कुटुंबीयांना असूनही आपल्याशी फसवणूक करण्यात आल्याचा दावा गिरीजा राऊत यांनी केला आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली असून, कापूरबावडी पोलीस तक्रारीतील सर्व आरोपांची सखोल चौकशी करत आहेत. या तक्रारीतील आरोप हे तक्रारदाराने केलेले असून, त्याबाबत संबंधित आरोपींची भूमिका अद्याप सार्वजनिकपणे समोर आलेली नाही.