रुग्णालयात थरार! महिला डॉक्टरला मारहाण, मोबाईल हिसकावला; शिंदे गटाच्या नगरसेवकाचा कथित CCTV व्हायरल, आरोग्य यंत्रणेत खळबळ


कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात महिला डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांशी झालेल्या कथित मारहाणीच्या घटनेने आरोग्य यंत्रणेत मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात शिवसेना (शिंदे गट) नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांवर धक्काबुक्की, शिवीगाळ आणि धमकावल्याचे आरोप करण्यात आले असून, घटनेचे कथित सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयातील काही कारणावरून वाद निर्माण झाला. त्यानंतर संबंधितांनी महिला डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करत धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे. कथित सीसीटीव्ही फुटेजमध्ये महिला डॉक्टर मदतीसाठी फोन करण्याचा प्रयत्न करत असताना त्यांचा मोबाईल हिसकावून खाली फेकल्याचे दिसत असल्याचा दावा केला जात आहे. तसेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना धमकावल्याचेही आरोप आहेत.

घटनेनंतर डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी कायदे असतानाही अशा घटना घडत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, हा वाद नेमका कशामुळे झाला, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पोलिसांकडून कथित सीसीटीव्ही फुटेजसह इतर पुराव्यांची पडताळणी सुरू असून, चौकशीनंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. या घटनेमुळे रुग्णालयातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या संरक्षणाबाबत कठोर उपाययोजनांची मागणी जोर धरू लागली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!