लोणावळ्यात पर्यटकांवर निर्बंध! 31 जुलैपर्यंत कलम 163 लागू; धबधबे, धरण परिसरात प्रवेशाला बंदी

पुणे : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे लोणावळा आणि मावळ परिसरात धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी लोणावळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) 2023 अंतर्गत कलम 163 लागू करण्याचे आदेश जारी केले आहेत. हे निर्बंध 6 जुलैच्या मध्यरात्रीपासून लागू होत असून 31 जुलै 2026 रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत प्रभावी राहणार आहेत.

पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या एकवीरा देवी मंदिर परिसर, भुशी धरण, लायन्स पॉईंट, टायगर पॉईंट, पवना धरण, लोहगड, विसापूर, तिकोणा आणि तुंग किल्ला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होत आहे. मात्र अतिवृष्टी, वेगवान पाण्याचा प्रवाह आणि दरडी कोसळण्याच्या वाढत्या घटनांमुळे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून निर्बंध लागू केले आहेत.
आदेशानुसार धबधबे, ओढे, नद्या आणि धरण परिसरात उतरण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच धोकादायक कड्यांवर सेल्फी, व्हिडिओग्राफी, रील्स शूटिंग आणि नैसर्गिक धबधब्यांमध्ये प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. मद्यपान, ध्वनीप्रदूषण, कचरा टाकणे, महिलांची छेडछाड तसेच बेजबाबदार वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. काही संवेदनशील धरण व नदीकाठ परिसरात चारचाकी व सहाचाकी वाहनांनाही प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे.

दरम्यान, लोणावळा–कर्जत घाट विभागात दरड कोसळल्याने रेल्वे मार्गावरील दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मंकी हिल आणि खंडाळा स्थानकांदरम्यान रेल्वे प्रशासनाकडून माती, दगड व खडक हटविण्याचे काम सुरू असून मार्ग लवकरात लवकर सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रशासनाने पर्यटकांना नियमांचे पालन करून सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे.
