लग्नाला 20 मिनिटं बाकी असताना मंडपात धडकले पोलीस; मुलीच्या आईला कोसळलं रडू, संभाजीनगरात खळबळ… नेमकं घडलं काय?


संभाजीनगर : संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज तालुक्यातील दिघी गावात ऐन लग्नमंडपात पोलिसांनी धडक देत एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखला. लग्नसोहळा सुरू होण्यास अवघी २० मिनिटे शिल्लक असताना पोलिसांनी कारवाई केल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर मुलीच्या आईला अश्रू अनावर झाले.

ही घटना रविवारी (५ जुलै) घडली. संबंधित अल्पवयीन मुलीने नुकत्याच झालेल्या दहावीच्या परीक्षेत ६५ टक्के गुण मिळवले होते. तिला पुढील शिक्षण घ्यायचे होते. मात्र, घरची अत्यंत हलाखीची परिस्थिती, वडिलांचे दारूचे व्यसन आणि आर्थिक अडचणींमुळे कुटुंबाने तिचे लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला होता.

लग्नाचा खर्च परवडत नसल्याने साखरपुड्याच्या दिवशीच विवाह उरकण्याचे नियोजन करण्यात आले होते. मुलीच्या २४ वर्षीय आत्याच्या मुलासोबत हा विवाह होणार होता. या सोहळ्यासाठी सुमारे २५० पाहुणे आणि वऱ्हाडी मंडपात उपस्थित होते.

दरम्यान, गावात बालविवाह होत असल्याची माहिती एका सजग नागरिकाला मिळाली. लग्न लागण्यास अवघी २० मिनिटे शिल्लक असताना त्यांनी तातडीने ‘चाइल्डलाइन’ आणि ‘डायल ११२’ वर संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली. नियंत्रण कक्षाने तत्काळ वाळूज पोलीस ठाण्याला कळवले आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत विवाह थांबवला.

चौकशीदरम्यान मुलीच्या आईने आपली व्यथा मांडताना सांगितले की, पतीला दारूचे व्यसन असून कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे. मुलीचा सांभाळ आणि पुढील जबाबदाऱ्या पेलणे कठीण होत असल्याने नात्यातच लग्न ठरवले होते. यानंतर पोलिसांनी कुटुंबाचे समुपदेशन करत बालविवाह प्रतिबंधक कायद्याची माहिती दिली आणि विवाह थांबवला.

सजग नागरिकाच्या वेळीच दिलेल्या माहितीद्वारे एका अल्पवयीन मुलीचे शिक्षण आणि भविष्य वाचवण्यात पोलिसांना यश आले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!