आळंदीत पूरस्थिती गंभीर! वारकरी आणि भाविकांना प्रशासनाचे तातडीचे आवाहन

पुणे : आषाढी वारी २०२६ निमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो वारकरी आणि भाविक आळंदीकडे रवाना झाले आहेत. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आळंदीत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, प्रशासनाने भाविकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे.

सततच्या पावसामुळे इंद्रायणी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. नदीला पूर आल्याने आळंदी शहरात प्रवेश करणारे चारही पूल पाण्याखाली गेले असून, शहरातील काही धर्मशाळा आणि पूलही जलमय झाले आहेत. तसेच इंद्रायणी घाट भाविकांसाठी बंद करण्यात आला असून, मंदिर परिसराकडे जाणाऱ्या अनेक रस्त्यांवरही पाणी साचले आहे.
परिस्थिती लक्षात घेऊन श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समिती, आळंदी नगरपरिषद आणि स्थानिक प्रशासनाने आळंदीकडे येणाऱ्या सर्व वारकरी व भाविकांना सध्या ज्या ठिकाणी आहेत, तेथेच सुरक्षित थांबण्याचे आवाहन केले आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत आळंदीमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करू नये, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

याशिवाय, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीलाच महत्त्व द्यावे, तसेच नदीपात्र, घाट परिसर आणि पाण्याखाली गेलेल्या पुलांवर जाणे टाळावे, असेही प्रशासनाने नागरिकांना बजावले आहे.

वारकरी आणि भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत असून, सर्वांनी संयम राखत प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समिती, आळंदी देवाची आणि आळंदी नगरपरिषद यांच्या वतीने करण्यात आले आहे.