‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ अडचणीत; रुपाली चाकणकरांचा 25 कोटींच्या अब्रुनुकसानीच्या दाव्यासह कायदेशीर इशारा

पुणे : नाशिकमधील कथित भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावर आधारित चर्चेत असलेला ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच कायदेशीर वादात अडकला आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेत्री दिपाली सय्यद यांना कायदेशीर नोटीस बजावत तब्बल 25 कोटी रुपयांच्या अब्रुनुकसानीचा दावा केला आहे.

चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर त्यामधील एका पात्राचे साधर्म्य रुपाली चाकणकर यांच्याशी असल्याची चर्चा सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. त्यानंतर चाकणकर यांनी सार्वजनिकरित्या याबाबत नाराजी व्यक्त करत कायदेशीर कारवाईचा इशारा दिला होता. आता त्यांनी तो इशारा प्रत्यक्षात उतरवत संबंधित सर्वांना नोटीस पाठवली आहे.
नोटीशीत चित्रपटाच्या प्रचारादरम्यान विविध डिजिटल प्लॅटफॉर्म आणि वेबसाइट्सवर आपले नाव व प्रतिमा सूचित करणारे संदर्भ वापरले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित प्रकरण न्यायप्रविष्ट असताना अशा प्रकारे नावाचा वापर करून जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा चाकणकर यांनी केला आहे. त्यामुळे मानसिक, सामाजिक आणि सार्वजनिक प्रतिमेला धक्का बसल्याचे नमूद करत त्यांनी नुकसानभरपाईची मागणी केली आहे.

कायदेशीर नोटीशीनुसार चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेत्री दिपाली सय्यद यांना सात दिवसांच्या आत उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे. अन्यथा पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

दरम्यान, या नोटीशीनंतर ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला असून, चित्रपटाच्या टीमकडून या आरोपांवर काय भूमिका मांडली जाते याकडे आता मनोरंजन क्षेत्रासह राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले आहे.