पुणे विमानतळावर मोठी दुर्घटना टळली! धावपट्टीवर अचानक कुत्रा; टेकऑफच्या क्षणी विमान थांबवलं, 120 प्रवासी बचावले

पुणे : पुणे विमानतळावर मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. पुणे-जयपूर एअर इंडिया एक्सप्रेसचे सुमारे 120 प्रवाशांसह उड्डाणासाठी सज्ज असलेले विमान टेकऑफसाठी धावपट्टीवर वेग घेत असतानाच अचानक एक भटका कुत्रा धावपट्टीवर आला. एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) ने तातडीने इशारा दिल्यानंतर वैमानिकाने प्रसंगावधान राखत अखेरच्या क्षणी आपत्कालीन ब्रेक लावले. त्यामुळे संभाव्य अपघात टळला, मात्र अचानक ब्रेक लागल्याने विमानातील प्रवाशांमध्ये काही काळ भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

ही घटना शुक्रवारी दुपारी सुमारे 3.15 वाजता घडली. विमान सुरक्षितपणे थांबवल्यानंतर त्याची तात्काळ तांत्रिक तपासणी करण्यात आली. सर्व यंत्रणा सुरळीत असल्याची खात्री झाल्यानंतर विमानाला पुन्हा उड्डाणाची परवानगी देण्यात आली आणि सुमारे 100 मिनिटांच्या विलंबानंतर दुपारी 4.55 वाजता विमान जयपूरच्या दिशेने रवाना झाले.
दरम्यान, पुणे विमानतळावर धावपट्टीवर भटक्या कुत्र्यांचा वावर हा गंभीर प्रश्न बनत असल्याचे पुन्हा समोर आले आहे. यापूर्वी 28 जून रोजी भुवनेश्वरहून येणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानालाही धावपट्टीवर कुत्रा आल्यामुळे ‘गो-अराउंड’ करावे लागले होते. सलग दुसऱ्यांदा अशी घटना घडल्याने विमानतळाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकारानंतर धावपट्टी परिसरातील भटक्या प्राण्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात असून, विमानतळ प्रशासनानेही या घटनेची गंभीर दखल घेत सुरक्षा व्यवस्थेचा आढावा सुरू केला आहे.
