LPG ग्राहकांसाठी मोठी खुशखबर! केंद्राचा यू-टर्न; गॅस पुरवठ्यावरचे सर्व निर्बंध हटवले

पुणे : देशातील लाखो एलपीजी (LPG) आणि एलएनजी (LNG) ग्राहकांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. पश्चिम आशियातील भू-राजकीय तणाव कमी होताच नैसर्गिक वायूच्या वितरणावर लावण्यात आलेले आपत्कालीन निर्बंध मागे घेण्यात आले आहेत. त्यामुळे घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्रातील गॅसचा पुरवठा पुन्हा पूर्वपदावर येणार असून वितरणाची जबाबदारी संबंधित कंपन्यांकडे सोपवण्यात आली आहे.

काही महिन्यांपूर्वी अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे होर्मुज सामुद्रधुनीतून होणाऱ्या ऊर्जा वाहतुकीवर मोठा परिणाम झाला होता. जागतिक स्तरावर कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा विस्कळीत झाल्याने भारतालाही त्याचा फटका बसला. आयातीवर परिणाम झाल्याने गॅस उपलब्धतेवर ताण निर्माण झाला आणि अनेक क्षेत्रांमध्ये पुरवठा नियंत्रित करण्याची वेळ सरकारवर आली.
याच पार्श्वभूमीवर 9 मार्च 2026 रोजी केंद्राने आपत्कालीन आदेश लागू करत गॅसचे प्राधान्याने वाटप करण्याचा निर्णय घेतला होता. घरगुती ग्राहक, वीज निर्मिती आणि खत उद्योगाला प्राधान्य देण्यात आले होते, तर इतर काही व्यावसायिक क्षेत्रांवरील पुरवठा मर्यादित करण्यात आला होता.

आता आंतरराष्ट्रीय परिस्थितीत सुधारणा झाल्याने पुरवठा साखळी पुन्हा सुरळीत झाली आहे. त्यामुळे गॅस वितरणावरील सर्व तात्पुरते निर्बंध हटवण्यात आले असून कंपन्यांना मागणीनुसार पुरवठा करण्याची मुभा देण्यात आली आहे. या निर्णयामुळे घरगुती सिलिंडरचा पुरवठा अधिक नियमित होण्याबरोबरच हॉटेल, उद्योग आणि व्यावसायिक क्षेत्रालाही मोठा दिलासा मिळणार आहे. सरकारच्या निर्णयामुळे ऊर्जा क्षेत्रातील अनिश्चितता कमी होऊन पुरवठा व्यवस्था अधिक स्थिर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
