पुण्यातील हॉटेल व्यावसायिकांना मोठा झटका! ‘मथुरा प्युअर व्हेज’ बंद; 7 रेस्टॉरंट्सचे परवाने निलंबित

पुणे : पुण्यातील अन्न सुरक्षा व्यवस्थेवर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी कारवाई अन्न व औषध प्रशासनाने (FDA) केली आहे. राज्यभर सुरू असलेल्या ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ या विशेष मोहिमेअंतर्गत पुणे शहरातील अनेक नामांकित हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सची अचानक तपासणी करण्यात आली. या कारवाईत प्रसिद्ध ‘मथुरा प्युअर व्हेज’ हॉटेल तात्पुरते बंद करण्याचे आदेश देण्यात आले असून, शहरातील सात रेस्टॉरंट्सचे अन्न परवानेही निलंबित करण्यात आले आहेत.

एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली 1 ते 3 जुलैदरम्यान राज्यभरातील सुमारे 70 हॉटेल्स आणि खाद्य आस्थापनांची तपासणी करण्यात आली. पुण्यातील तपासणीत अनेक ठिकाणी अन्न सुरक्षा व मानके कायद्याचे उल्लंघन झाल्याचे समोर आले. स्वयंपाकघरात अस्वच्छता, निकृष्ट दर्जाचे अन्न, मुदतबाह्य खाद्यपदार्थांचा साठा तसेच स्वच्छतेच्या नियमांकडे दुर्लक्ष झाल्याचे निरीक्षण पथकाने नोंदवले.
विशेषतः ‘मथुरा प्युअर व्हेज’ येथे अन्नपदार्थांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. प्रयोगशाळेचा अंतिम अहवाल प्राप्त होईपर्यंत संबंधित हॉटेल बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. अहवालानुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, गंभीर त्रुटी आढळलेल्या सात नामांकित रेस्टॉरंट्सचे परवाने तात्पुरते निलंबित करण्यात आले असून, आवश्यक सुधारणा आणि नियमांचे पालन केल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाणार आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा एफडीएकडून देण्यात आला आहे.

अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्यासाठी ही मोहीम आगामी काळातही सुरू राहणार असून, पुण्यासह राज्यातील इतर शहरांमध्येही अचानक तपासण्या आणि कठोर कारवाया करण्यात येणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने संकेत दिले आहेत. त्यामुळे हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली असून, खाद्य व्यवसायात स्वच्छता आणि गुणवत्तेला प्राधान्य देण्याचा संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.