एकनाथ शिंदे यांची अचानक प्रकृती खालावली; ठाण्यातील रुग्णालयात दाखल, नेमकं काय घडलं?


मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’ मोहिमेसह पावसाळी अधिवेशनामुळे एकनाथ शिंदे यांची मोठी धावपळ सुरू होती. या सततच्या दगदगीमुळे त्यांची प्रकृती खालावल्याचे सांगितले जात आहे. अधिवेशनादरम्यान त्यांना तापही आला होता. मात्र, त्यांनी कामाचा ताण कायम ठेवला. त्यानंतर प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, शुक्रवारी रात्री उशिरा गंगुबाई शिंदे सभागृहात शिवसेना (ठाकरे गट)च्या उपनेत्या शुभांगी पाटील यांनी शिवसेना (शिंदे गट)मध्ये प्रवेश केला. हा पक्षप्रवेश रात्री उशिरापर्यंत सुरू होता. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळे एकनाथ शिंदे या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीत खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडला.

गेल्या काही दिवसांत ‘ऑपरेशन टायगर’ अंतर्गत एकनाथ शिंदे यांनी शिवसेना (ठाकरे गट)तील अनेक नेत्यांना आपल्या गटात आणण्यात यश मिळवले आहे. त्याचबरोबर राज्यातील राजकीय घडामोडी आणि सुरू असलेल्या अधिवेशनामुळे त्यांची धावपळ वाढली होती.

सध्या एकनाथ शिंदे यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहितीही सूत्रांकडून मिळत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!