पुण्यात मध्यरात्री थरार! मोबाईलच्या किरकोळ वादातून २४ वर्षीय तरुणाचा बॅटने ठेचून निर्घृण खून


पुणे : चाकण परिसरात वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमध्ये आणखी एका धक्कादायक घटनेची भर पडली आहे. मोबाईल घेण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून २४ वर्षीय तरुणाची लाकडी बॅटने बेदम मारहाण करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना मंगळवारी (३० जून) मध्यरात्री चाकणमधील आंबेठाण चौक परिसरात घडली.

मृत तरुणाचे नाव गोविंद शिवनारायण ढगे (वय २४, मूळ रा. धानोरा खुर्द, ता. आंबेजोगाई, जि. बीड) असे असून तो सध्या चाकणमधील आंबेठाण चौक परिसरात वास्तव्यास होता.

या प्रकरणी खाजा जमालउद्दीन शेख (वय २३) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाकण उत्तर पोलीस ठाण्यात आकाश रवी सोनवणे (वय २५) आणि बुद्धभूषण उर्फ मयूर मुकुंद मोकळे (वय २३, दोघे रा. मलकापूर, जि. बुलढाणा) यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोविंद ढगे हा मंगळवारी मध्यरात्री मद्यप्राशन केल्यानंतर आरोपी राहत असलेल्या आंबेठाण चौकातील संकल्प हॉटेलच्या पाठीमागील भाड्याच्या खोलीवर गेला होता. तेथे मोबाईल घेण्याच्या कारणावरून दोन्ही बाजूंमध्ये वाद झाला. हा वाद काही क्षणांतच विकोपाला गेला.

रागाच्या भरात आरोपींनी गोविंदला प्रथम लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर खोलीत असलेल्या लाकडी बॅटने त्याच्या हात, पाय, छाती आणि डोक्यावर सपासप वार केले. गंभीर मारहाणीत गोविंदचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच चाकण उत्तर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तपास सुरू केला आहे. मोबाईलच्या किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याने चाकण परिसरात खळबळ उडाली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!