सावधान! राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा; 29 जिल्ह्यांना हवामान खात्याचा मोठा अलर्ट


मुंबई : राज्यात मान्सूनने पुन्हा जोर धरला असून, अनेक भागांत मुसळधार पावसाची हजेरी लागली आहे. मुंबई, ठाणे, कोकण, पुणे, सिंधुदुर्गसह विविध जिल्ह्यांत जोरदार पाऊस कोसळत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यातील 29 जिल्ह्यांसाठी पावसाचा इशारा जारी केला आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार 1 जुलैपासून पुढील आठ दिवस राज्यातील अनेक भागांत जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारेही वाहू शकतात. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबई आणि उपनगरांमध्ये काल रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू असून ठाणे, कल्याण, डोंबिवली, कांदिवली, बोरिवली, मालाड, दहिसर, अंधेरी आणि गोरेगाव परिसरातही दमदार पावसाची नोंद झाली आहे. काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला असून, झाडे उन्मळून पडल्याच्या घटनाही घडल्या आहेत.

कोकण आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुणे जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून रखडलेल्या पेरण्यांना वेग येण्याची शक्यता आहे. मात्र, राज्यातील काही भागांत अद्यापही समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

दरम्यान, परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील आडगाव बाजार परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे गावालगतच्या ओढ्याला पूर आला. या पुरात 65 वर्षीय शेतकरी महिला मंगलबाई शेषराव खंडागळे वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली असून, गावकऱ्यांकडून त्यांचा शोध सुरू आहे.

हवामान विभागाने पुढील काही दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केला असून, नागरिकांनी नदी-नाले, पूरग्रस्त भाग आणि धोकादायक ठिकाणांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!