जुलैच्या पहिल्याच दिवशी आनंदाची बातमी! गॅस सिलेंडरच्या दरात मोठी कपात; जाणून घ्या नवीन दर

पुणे : नव्या महिन्याच्या सुरुवातीलाच व्यावसायिक क्षेत्रासाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. तेल विपणन कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत 183.50 रुपयांची कपात जाहीर केली असून, हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबा आणि केटरिंग व्यवसायाला याचा मोठा फायदा होणार आहे.

गेल्या काही महिन्यांपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती सातत्याने वाढत असल्याने व्यवसायिकांचे खर्च मोठ्या प्रमाणात वाढले होते. त्यामुळे अनेक ठिकाणी खाद्यपदार्थांच्या किमतीही वाढल्या होत्या. मात्र, नव्या दरकपातीमुळे व्यावसायिकांना काहीसा आर्थिक दिलासा मिळणार असून, त्याचा सकारात्मक परिणाम बाजारपेठेवरही दिसून येण्याची शक्यता आहे.
मात्र, १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना अद्यापही स्वस्त गॅससाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

दरकपातीनंतर दिल्लीमध्ये १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 2,930 रुपये झाली आहे. यापूर्वी हा दर 3,113.50 रुपये होता. त्यामुळे एका सिलिंडरमागे थेट 183.50 रुपयांचा फायदा व्यावसायिकांना मिळणार आहे.

गेल्या काही महिन्यांत जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीतील चढ-उतार आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थितीचा एलपीजीच्या दरांवर मोठा परिणाम झाला होता. मात्र, अलीकडील घडामोडींनंतर पुरवठा व्यवस्था सुधारत असल्याने व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ही कपात करण्यात आल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीतही आगामी काळात काहीसा दिलासा मिळू शकतो, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असली तरी त्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.