जुलैपासून जुन्या नोटा बंद होणार? व्हायरल मेसेजनंतर खळबळ; सरकार, RBI आणि बँकेने दिले मोठे स्पष्टीकरण

पुणे : सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून 2005 पूर्वी छापलेल्या ₹10, ₹20, ₹50 आणि ₹100 च्या नोटा जुलै 2026 पासून चलनातून बाद होणार असल्याचा मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये बँक ऑफ महाराष्ट्रचे अधिकृत चिन्ह वापरण्यात आल्याने अनेक नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, पुन्हा एकदा नोटबंदीची चर्चा रंगू लागली आहे. मात्र, या दाव्यामागील सत्य समोर आल्यानंतर हा संदेश पूर्णपणे दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

व्हायरल पोस्टमध्ये जुन्या नोटा बँकांमध्ये जमा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे अनेक नागरिकांनी या संदेशाची सत्यता तपासण्यास सुरुवात केली. काही ठिकाणी बँकांमध्ये चौकशीसाठी गर्दी झाल्याचेही दिसून आले. मात्र, यासंदर्भात केंद्र सरकार आणि संबंधित यंत्रणांनी तातडीने भूमिका स्पष्ट केली आहे.
प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) ने या संदेशाची पडताळणी करून तो बनावट असल्याचे जाहीर केले. बँक ऑफ महाराष्ट्रने अशाप्रकारची कोणतीही सूचना जारी केलेली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच जुन्या नोटा चलनातून बाद करण्याबाबत सरकार किंवा भारतीय रिझर्व्ह बँकेने कोणताही निर्णय घेतलेला नसल्याचेही सांगण्यात आले.

दरम्यान, बँक ऑफ महाराष्ट्रनेही नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. बँकेच्या नावाचा आणि लोगोचा गैरवापर करून खोटी माहिती पसरवली जात असल्याचे सांगत अशा संदेशांवर विश्वास ठेवू नये, तसेच ते पुढे पाठवू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

रिझर्व्ह बँकेच्या विद्यमान नियमांनुसार 2005 पूर्वीच्या नोटांवर कोणतीही बंदी लागू करण्यात आलेली नाही. या नोटा अद्याप वैध असून देशभरातील व्यवहारांमध्ये स्वीकारल्या जात आहेत. नोटांच्या डिझाइन, सुरक्षा वैशिष्ट्ये आणि चलन व्यवस्थापनासंदर्भात वेळोवेळी चर्चा होत असली तरी जुन्या नोटा अचानक बंद करण्याचा कोणताही निर्णय सध्या अस्तित्वात नाही.
तज्ज्ञांच्या मते, सोशल मीडियावर सरकारी संस्थांच्या नावाने बनावट संदेश प्रसारित करून नागरिकांमध्ये भीती आणि संभ्रम निर्माण करण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे कोणतीही आर्थिक किंवा बँकिंगसंबंधी माहिती मिळाल्यास ती अधिकृत संकेतस्थळ, RBI, संबंधित बँक किंवा PIB च्या माध्यमातूनच पडताळून पाहणे आवश्यक आहे.
सध्या तरी जुन्या ₹10, ₹20, ₹50 आणि ₹100 च्या नोटा पूर्णपणे वैध आहेत. त्यामुळे नोटबंदी किंवा नोटा बंद होणार असल्याच्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.