मोठी कारवाई! तुकाराम मुंढेंचा मुंबईतील 6 हॉटेल्सवर धडक; अन्न सुरक्षा परवाने निलंबित

मुंबई : मुंबईत अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि बेकरींविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मोठी कारवाई केली आहे. एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार करण्यात आलेल्या तपासणीत गंभीर त्रुटी आढळल्याने नामांकित रेस्टॉरंटसह एकूण सहा आस्थापनांचे अन्न सुरक्षा परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

२७ जून रोजी नरिमन पॉइंट येथील ‘फ्लिंट अँड वार्सा’ या रेस्टॉरंटची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान अन्नपदार्थांच्या चुकीच्या ब्रँडिंगसह अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्याने संबंधित रेस्टॉरंटचा परवाना निलंबित करण्यात आला.
याशिवाय, बोरीवलीतील एम. के. बेकरीमध्ये नूतनीकरणाचे काम सुरू असतानाही अन्न उत्पादन सुरू असल्याचे आणि परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आढळून आल्याने कारवाई करण्यात आली. भांडुप, सांताक्रूझ आणि वांद्रे परिसरातील अन्य आस्थापनांवरही एफडीएने धडक कारवाई केली आहे.

अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत किंवा स्वच्छतेबाबत शंका असल्यास नागरिकांनी तातडीने तक्रार नोंदवावी, असे आवाहन एफडीएने केले आहे. यासाठी 1800-222-365 हा टोल-फ्री हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.

दरम्यान, हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांना विनाकारण बाटलीबंद पाणी समोर ठेवण्याची प्रथा थांबवण्याचे स्पष्ट निर्देश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत. प्रत्येक ग्राहकाला मोफत शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे बंधनकारक असून, यासंदर्भातील सूचना फलकही आस्थापनांमध्ये लावणे आवश्यक आहे. ग्राहकाने स्पष्ट मागणी केल्यासच त्याला बाटलीबंद पाणी उपलब्ध करून द्यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.