मोठी बातमी! केंद्रीय मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार, श्रीकांत शिंदे यांना कॅबिनेट, प्रतापराव जाधवांचं मंत्रिपद जाणार? जाणून घ्या..

नवी दिल्ली : सध्या केंद्रीय राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. आता केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या होण्याची शक्यता सांगितली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विदेशातून भारतात येतील आणि पुन्हा परवा दुसऱ्या दौऱ्याला जाण्याची शक्यता आहे. यामध्ये आता कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसेनामध्ये आलेले खासदार, तृणमूलचे फुटीर खासदार, आपचे खासदार यापैकी काहींना संधी तसेच आधीच्या काही मंत्र्यांना डच्चू मिळून नवीन चेहऱ्याना संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. शिवसेनेकडे यावेळी एक मंत्रीपद येणार अशी सूत्रांची माहिती आहे.
यामध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांचे नाव चर्चेत आहे. ऑपरेशन टायगर’च्या यशानंतर केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेला एक कॅबिनेट मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. राज्यमंत्री पदासाठी प्रतापराव जाधव यांच्याऐवजी संजय जाधव यांच्या नावाची चर्चा सुरु असल्याची माहिती शिंदेंच्या शिवसेनेतील वरिष्ठ सूत्रांनी याबाबत माहिती दिली.

या मंत्रिपदासाठी परभणीचे खासदार संजय उर्फ ‘बंडू’ जाधव यांचे नाव आघाडीवर आहे. संजय जाधव सलग तिसऱ्यांदा परभणीचे खासदार म्हणून निवडणून आले आहेत. पुढच्या काही दिवसात केंद्रीय कॅबिनेटचा विस्तार होणार असल्याची चर्चा आहे. त्याआधी खासदार श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकरांनी तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलं.

दोघांनीही चार किलोमीटर पायी चालत दर्शन घेतलं. त्यामुळे या दोघांची नावं चर्चेत आहेत. ठाकरेंचे 6 बंडखोर शिवसेनेत सामील झाल्यानं शिवसेनेच्या खासदारांची संख्या 13 झाली आहे. यामुळे शिवसेनेला एक कॅबिनेट मंत्रीपद आणि एक राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे भाजप काय निर्णय घेणार हे लवकरच समजेल.