नसरापूर अत्याचार-हत्या प्रकरणात कोर्टाचा मोठा निकाल! नराधम भीमराव कांबळे दोषी; फाशी की जन्मठेप?


पुणे : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी साडेतीन वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणाचा निकाल आज (गुरुवारी, २५ जून) जाहीर झाला. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या पावणेदोन महिन्यांत या खटल्याची सुनावणी पूर्ण होत निकाल लागल्याने हा राज्याच्या न्यायालयीन इतिहासातील जलदगतीने निकाली निघालेल्या महत्त्वाच्या खटल्यांपैकी एक ठरला आहे.

या प्रकरणात आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे (वय ६५) याला न्यायालयाने दोषी ठरवले आहे. पुणे जिल्हा सत्र न्यायालयातील विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी निकाल देताना आरोपीविरुद्ध दाखल सर्व आरोप सिद्ध झाल्याचे नमूद केले. संबंधित कलमांपैकी दोन गुन्ह्यांमध्ये फाशीची, एका गुन्ह्यात जन्मठेपेची तर एका गुन्ह्यात १४ वर्षांच्या कारावासाची तरतूद असल्याची माहिती न्यायालयाने दिली.

सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी आरोपीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून, “तू तो प्रसंग आठव आणि तुलाच सांग, तुला कोणती शिक्षा द्यायला हवी?” असा प्रश्न विचारला. त्यावर आरोपीने पुन्हा स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत, “मी त्या मुलीला गाठी शेव खाण्यासाठी घेऊन गेलो होतो. त्यावेळी मी पाय घसरून पडलो आणि तिच्याही डोक्याला मार लागला. तिला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण ती ओरडत होती,” असे सांगितले.

मात्र न्यायाधीशांनी आरोपीला स्पष्ट शब्दांत सुनावले की, “आता तू जे सांगतो आहेस तो इतिहास झाला आहे. तुझ्यावरचा गुन्हा सिद्ध झाला आहे. तुला कोणती शिक्षा द्यावी?” यावर आरोपीने कोणतेही उत्तर दिले नाही. त्यानंतर न्यायाधीशांनी त्याला खाली बसण्यास सांगितले.

दरम्यान, दोषी ठरलेल्या आरोपीला कोणती शिक्षा द्यावी याबाबत दोन्ही बाजूंकडून युक्तिवाद सुरू आहे. सरकारी वकिलांनी आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. “आरोपीला कोणताही पश्चात्ताप नाही. तो दयेच्या लायकीचा नाही. ज्या चिमुकलीने त्याच्यावर विश्वास ठेवला, तिच्यावर तब्बल ३९ मिनिटे अमानुष अत्याचार करण्यात आले,” असा युक्तिवाद सरकारी पक्षाने केला.

वैद्यकीय तपासणीत पीडित बालिकेवर विविध प्रकारचे लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आल्याचेही सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले. तसेच बालिकेच्या शरीरावर १८ जखमा आढळल्याचा उल्लेख करत, समाजात महिलांमध्ये आणि मुलींमध्ये सुरक्षिततेची भावना टिकवण्यासाठी आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली.

या प्रकरणाच्या सुनावणीसाठी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल हे देखील न्यायालयात उपस्थित होते. आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा देण्यात यावी, जेणेकरून भविष्यात अशा गुन्ह्यांना आळा बसेल, अशी मागणी सरकारी पक्षाने न्यायालयाकडे केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!