नाशिक हादरलं! शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला जाळ्यात ओढलं, अत्याचारानंतर आरोपीने गाठली क्रूरतेची परिसीमा..


नाशिक : राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातून संतापजनक घटना समोर आली आहे. इथं एका विवाहित नराधमाने स्वतःच्या शेजारी राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले.

एवढेच नाही, तर या अत्याचारातून ती मुलगी गरोदर राहिल्यानंतर आणि तिने एका बाळाला जन्म दिला. स्वतःचं बिंग फुटू नये म्हणून आरोपीनं तिला एका झोपडीत लपवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दिंडोरी पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

रवींद्र मोरे असं अटक केलेल्या नराधम आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, आरोपी रवींद्र मोरे हा विवाहित असून त्याला एक मुलगी देखील आहे. पीडित अल्पवयीन मुलगी आणि आरोपी रवींद्र हे दोघेही जवळजवळ राहत असल्याने त्यांची एकमेकांशी ओळख होती. पीडितेच्या याच परिचयाचा आणि तिच्या अजाणतेपणाचा गैरफायदा आरोपी मोरेने घेतला.

आरोपीनं तिच्याशी वारंवार लैंगिक अत्याचार केला. या अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली. काही दिवसांनी मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिने हा सर्व प्रकार आपल्या आईला रडत रडत सांगितला. मुलीची अवस्था पाहून आई तिला तपासणीसाठी आणि उपचारासाठी दवाखान्यात घेऊन जाणार होती.

मात्र, आपण केलेले हे भयंकर कृत्य उघडकीस येईल आणि आपले बिंग फुटेल, या भीतीने आरोपीने दवाखान्यात जाण्यापूर्वीच पीडित मुलीला आपल्या मोटारसायकलवरून पळवून नेले.

कानडी येथे पळवून नेल्यानंतर काही काळातच पीडित अल्पवयीन मुलीने एका मुलाला जन्म दिला. प्रसूती झाल्यानंतरही आरोपीने तिला तिच्या घरी जाऊ दिलं नाही, त्याने पीडितेला आणि तिच्या नवजात बाळाला सिन्नर तालुक्यातील पंचाळे येथील एका निर्जन झोपडीत लपवून ठेवले.

आपली मुलगी बेपत्ता असल्याने आणि तिच्यावर झालेल्या या भयंकर प्रसंगामुळे संतापलेल्या पीडितेच्या वडिलांनी अखेर दिंडोरी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि आरोपीविरोधात रीतसर फिर्याद दाखल केली. या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी तपासाची चक्रे अतिशय वेगाने फिरवली.

संशयित आरोपी रवींद्र मोरे याचा शोध घेऊन पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. एका विवाहित तरुणाने अशाप्रकारे अल्पवयीन मुलीचं आयुष्य बरबाद केल्याने गावात संताप व्यक्त केला जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!