पवार कुटुंबाचा डान्स व्हायरल! रेवती सुळेच्या संगीत समारंभात जय आणि युगेंद्र पवारांचा ठेका; व्हिडीओ चर्चेत


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. 20 जून रोजी मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल (BKC) येथील भव्य सभागृहात रेवती सुळे आणि सारंग लखानी यांचा विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. या सोहळ्याला राजकीय, सामाजिक, उद्योग आणि चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली.

लग्नसोहळ्यापूर्वी झालेल्या मेहंदी आणि संगीत समारंभातील फोटो व व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. त्यापैकी एका व्हिडीओने विशेष लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडीओमध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र जय पवार आणि श्रीनिवास पवार यांचे पुत्र युगेंद्र पवार स्टेजवर दमदार डान्स करताना दिसत आहेत.

 

व्हायरल व्हिडीओमध्ये जय पवार ‘सोनी दे नखरे’ या लोकप्रिय गाण्यावर नृत्य करताना दिसतात, तर युगेंद्र पवार ‘सुबह होने ना दे’ या गाण्यावर परफॉर्मन्स देताना पाहायला मिळतात. पवार कुटुंबातील सदस्यांचा हा उत्साह सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

रेवती सुळेच्या विवाहसोहळ्यासाठी संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आले होते. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही व्हिलचेअरवरून उपस्थित राहून नातीला आशीर्वाद दिला.

या सोहळ्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शर्मिला ठाकरे, अमित ठाकरे, मिताली ठाकरे, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.

रेवती सुळे यांनी नागपूरचे उद्योगपती आणि राजकारणी अरुण लखानी यांचे पुत्र सारंग लखानी यांच्याशी विवाह केला आहे. संगीत समारंभात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान यानेही उपस्थिती लावत आपल्या लोकप्रिय गाण्यांवर नृत्य केले. ‘कोई मिल गया’ या गाण्यावर शाहरुख खान आणि रेवती सुळे यांचा डान्स उपस्थितांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.

याशिवाय अमिताभ बच्चन, जया बच्चन, खासदार आणि अभिनेते रवी किशन यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही या भव्य विवाहसोहळ्याला हजेरी लावली. त्यामुळे हा विवाहसोहळा राजकीय आणि मनोरंजन विश्वातील दिग्गजांच्या उपस्थितीमुळे विशेष चर्चेत राहिला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!