उकाड्याने हैराण पुणेकरांना दिलासा! अखेर ‘या’ दिवशी पावसाची होणार दमदार एन्ट्री


पुणे : गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या नागरिकांची वाट आता संपण्याची चिन्हे असून, भारतीय हवामान विभागाने (IMD) पुण्यात पावसाच्या पुनरागमनाबाबत महत्त्वाचा अंदाज व्यक्त केला आहे.

हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, 23 जूनपासून पुणे शहर आणि परिसरात मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून जाणवत असलेल्या तीव्र उकाड्यापासून पुणेकरांना दिलासा मिळू शकतो.

मान्सूनची वाटचाल काही दिवसांपासून मंदावली होती. अरबी समुद्रातील कमकुवत मान्सून प्रवाह, वायव्येकडून येणारे उष्ण व कोरडे वारे आणि कमी दाबाच्या प्रणालींचा अभाव यामुळे पावसाचा वेग कमी झाला होता. मात्र, 23 जूननंतर परिस्थिती अनुकूल होत असून मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

पावसाने दडी मारल्याने पुणे शहरात उष्णतेचा आणि उकाड्याचा त्रास वाढला आहे. शुक्रवारी शहरातील कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.

आज शनिवारी शहरात कमाल तापमान 37 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता असून दिवसभर आकाश मुख्यतः निरभ्र राहील. सायंकाळनंतर काही भागांत ढगाळ वातावरण निर्माण होण्याचा अंदाज आहे.

दरम्यान, 23 जूनपासून तापमानात किंचित घट होण्याची शक्यता असून ढगाळ वातावरणासह मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची सुरुवात होऊ शकते. त्यामुळे आता पुणेकरांच्या नजरा पुढील आठवड्यातील पावसाकडे लागल्या आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!