बारामतीकरांनो सावध! पाणीटंचाईच्या छायेत शहरात ‘एक दिवसाआड’ पाणीपुरवठा; नवे वेळापत्रक जाहीर..


बारामती : निरा डावा कालव्यातील पाण्याचा प्रवाह बंद पडल्याने बारामती शहर आणि परिसरातील पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. उपलब्ध जलसाठा झपाट्याने कमी होत असल्याने प्रशासनाने पाण्याचे नियोजन करण्यासाठी पर्यायी व्यवस्था लागू केली असून आता शहरातील विविध भागांना नियोजित पद्धतीने पाणीपुरवठा केला जाणार आहे. कालव्यातील प्रवाह सुरळीत होईपर्यंत ही व्यवस्था कायम राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

सध्या शहराला पुरवठा करणाऱ्या जलस्रोतांमध्ये मर्यादित पाणी उपलब्ध असल्याने सर्व भागांना दररोज पाणी देणे शक्य नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे समान वितरण करण्यासाठी नव्या वेळापत्रकानुसार पुरवठा करण्यात येणार आहे. यामुळे शहरातील काही भागांमध्ये ठरावीक दिवशी नळांना पाणी येणार नाही.

नव्या नियोजनानुसार शहरातील म्हाडा कॉलनी, समर्थनगर, आमराई, सिद्धार्थनगर, विठ्ठलनगर, सुहासनगर, जवाहरनगर, सिनेमा रोड, अशोकनगर, आनंदनगर, वसंतनगर, विवेकानंदनगर, महादेव मळा, सद्गुरूनगर, पतंगशाहनगर, क्षत्रियनगर, सुभाष चौक आणि कचेरी रोड परिसरातील नागरिकांना एका दिवसाचा पाणीपुरवठा खंडित राहणार आहे. त्याचप्रमाणे कसबा, फलटण रोड, रेणुकानगर, शिक्षक सोसायटी, लक्ष्मीनारायण नगर, माळेगाव रोड, हनुमाननगर, शिवाजीनगर, कारभारीनगर, सावतामाळीनगर, श्रीरामनगर, चांदणी चौक, पंचशीलनगर, साठेनगर, जगताप मळा आणि नवीन मोरगाव रोड परिसरालाही या नियोजनाचा फटका बसणार आहे.

दरम्यान, सायली हिल आणि जळोची जलशुद्धीकरण केंद्रांमधून पाणी मिळणाऱ्या भागांसाठीही स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे. रुई, डेरेवस्ती, सूर्यनगरी, देसाई इस्टेट, अंबिकानगर, जळोची गावठाण, बावळेवस्ती, तान्हाईनगर, महिला सोसायटी आणि प्रगतीनगर या भागांतील पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. तसेच तांदूळवाडी गावठाण, सहयोग सोसायटी, निरा कॅनॉल सोसायटी आणि दूध संघ सोसायटी परिसरालाही नियोजित पद्धतीने पाणीपुरवठा केला जाणार आहे.

पाण्याची सद्यस्थिती लक्षात घेता नागरिकांनी आवश्यक तेवढाच साठा करून पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देत जलसाठ्याचे व्यवस्थापन करण्यात येत असून कालव्यातील पाण्याचा प्रवाह सुरू झाल्यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे. सध्या मात्र बारामतीकरांना काही दिवस बदललेल्या जलपुरवठा व्यवस्थेनुसारच नियोजन करावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!