श्रीकांत शिंदेंनी गुपचूप पुण्यात दोन विमानं पाठवली, ओमराजे निंबाळकर रात्री 1 वाजता… ‘ऑपरेशन टायगर’ चर्चेत मोठा ट्विस्ट

पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय सस्पेन्स निर्माण झाला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांदरम्यान खासदार ओमराजे निंबाळकर हे रात्री 1 वाजता दिल्लीत दाखल झाल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या घडामोडींमुळे ठाकरे गटात अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.

सूत्रांच्या दाव्यानुसार, पुणे विमानतळावर संपूर्ण प्रवासासाठी अत्यंत गोपनीय व्यवस्था करण्यात आली होती. दोन खासगी विमानांची तयारी ठेवण्यात आली होती आणि ही हालचाल पूर्णपणे गुप्त ठेवण्यात आली होती. सुरुवातीला दुपारी 3 वाजता उड्डाण ठरले होते, मात्र त्यानंतर सलग तीन वेळा वेळ बदलण्यात आली. 5 वाजता, नंतर 9 वाजता आणि अखेर रात्री 1 वाजता अंतिम उड्डाण झाल्याचे सांगितले जात आहे.
या अचानक बदललेल्या वेळापत्रकामुळे राजकीय चर्चांना अधिकच उधाण आले आहे. हा संपूर्ण प्रवास ‘ऑपरेशन टायगर’शी जोडला जात असून, शिवसेना गटातील काही खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा राजकीय वर्तुळात केला जात आहे.

या कथित विमान प्रवासात ओमराजे निंबाळकर यांच्यासोबत इतर काही नेतेही असल्याची चर्चा आहे. त्यात माजी मंत्री तानाजी सावंत आणि जय राजे निंबाळकर यांचीही नावे पुढे येत आहेत. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.

दरम्यान, या संपूर्ण घडामोडींमुळे मातोश्रीवरही हालचाली वाढल्याचे संकेत मिळत आहेत. उद्धव ठाकरे यांनी खासदारांची तातडीची बैठक घेतल्याची माहितीही समोर येत आहे. पक्षातील एकजूट टिकवण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
‘ऑपरेशन टायगर’च्या या नव्या ट्विस्टमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या भूकंपाची शक्यता वर्तवली जात असून, पुढील काही तास अत्यंत निर्णायक मानले जात आहेत.