उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचंही काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार? रवी राणांचा खळबळजनक दावा; राष्ट्रवादीवरही साधला निशाणा

अमरावती : राज्यात विधानपरिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच महाविकास आघाडीतील पक्षांच्या भवितव्याबाबत नव्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे. आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे तसेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे भविष्यात काँग्रेसमध्ये विलिनीकरण होऊ शकते, असा दावा करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

माध्यमांशी संवाद साधताना रवी राणा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यातील संबंधांवर भाष्य केले. शरद पवार यांचे राजकीय मूळ काँग्रेसमध्ये असल्याचा उल्लेख करत त्यांनी भविष्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडू शकतात, असे संकेत दिले. याचबरोबर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबाबतही मोठे वक्तव्य केले.
राणा यांच्या मते, भाजपविरोधी राजकारणाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि ठाकरे गटातील जवळीक वाढत आहे. संजय राऊत आणि काँग्रेस नेतृत्वातील बैठका, तसेच दिल्लीतील राजकीय घडामोडींचा दाखला देत त्यांनी भविष्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) काँग्रेससोबत अधिकृतपणे एकरूप होण्याची शक्यता व्यक्त केली. भाजपला रोखण्यासाठी विरोधी पक्ष एकत्र येण्याचा प्रयत्न करत असल्याची टीकाही त्यांनी केली.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार असल्याच्या चर्चांनाही वेग आला आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी हे वृत्त स्पष्टपणे फेटाळून लावले आहे. राष्ट्रवादी स्वतंत्र पक्ष म्हणून काम करत असून अशा चर्चांना कोणताही आधार नसल्याचे त्यांनी म्हटले. तसेच काँग्रेसच्या नेत्यांनी आधी स्वतःचा पक्ष मजबूत करण्यावर भर द्यावा, असा टोला त्यांनी लगावला.

विधानपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या या दाव्यांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून रवी राणा यांच्या वक्तव्यावर महाविकास आघाडीतील नेते कोणती प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.