मुंबईत २५ लाखांच्या नोकरीत ‘फक्त’ गुजराती-मारवाडी उमेदवारांना प्राधान्य? जाहिरातीवरून नवा वाद


मुंबई : आर्थिक राजधानी मुंबईत रोजगाराच्या संधींमध्ये स्थानिक उमेदवारांना डावलले जात असल्याचा आरोप पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. एका खासगी कंपनीने व्यावसायिक नेटवर्किंग प्लॅटफॉर्म लिंक्डइनवर प्रसिद्ध केलेल्या नोकरीच्या जाहिरातीत विशिष्ट समाजातील उमेदवारांनाच अर्ज करण्याचे आवाहन केल्याचा दावा समोर आला असून, या प्रकरणावरून मराठी संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कंपनीने वार्षिक सुमारे २५ लाख रुपयांचे पॅकेज असलेल्या पदासाठी उमेदवारांची मागणी केली होती. मात्र जाहिरातीत ‘फक्त गुजराती किंवा मारवाडी उमेदवारांनी अर्ज करावा’ असा उल्लेख करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या जाहिरातीचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रकरणाने वेग घेतला.

महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया देत, मुंबईसारख्या शहरात भाषिक आणि सामाजिक आधारावर उमेदवारांची निवड करणे अत्यंत गंभीर बाब असल्याचे म्हटले आहे. मराठी युवकांना रोजगाराच्या संधींपासून दूर ठेवण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप करत त्यांनी संबंधित कंपनीची चौकशी करून कठोर कारवाईची मागणी केली आहे.

देशमुख यांनी राज्य सरकार आणि प्रशासनाने या प्रकरणाची दखल घ्यावी, संबंधित जाहिरात देणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी तसेच अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी स्पष्ट धोरण आखावे, अशी मागणी केली आहे. दोन दिवसांत संबंधित कंपनीची माहिती समोर आणून पुढील भूमिका जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, अशा प्रकारची घटना यापूर्वीही समोर आली होती. २०२४ मध्ये गिरगाव परिसरातील एका खासगी कंपनीच्या ग्राफिक डिझायनर पदासाठीच्या जाहिरातीत विशिष्ट उमेदवारांबाबत आक्षेपार्ह अट नमूद केल्याचा आरोप झाला होता. त्या प्रकरणावरूनही मोठा वाद निर्माण झाला होता.

मुंबईतील रोजगाराच्या संधी, स्थानिकांना प्राधान्य आणि खासगी क्षेत्रातील भरती प्रक्रियेतील पारदर्शकता या मुद्द्यांवरून पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून, संबंधित जाहिरातीमागील वस्तुस्थिती काय आहे आणि प्रशासन याबाबत कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!