विधानपरिषद निवडणुकीनंतर पुणे काँग्रेसमध्ये खदखद; अरविंद शिंदेंची हायकमांडकडे तक्रार

पुणे : पुणे विधान परिषद निवडणुकीनंतर काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी समोर आली आहे. काँग्रेसचे माजी नगरसेवक अरविंद शिंदे यांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधात पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केल्याची माहिती समोर आली आहे.

अरविंद शिंदे यांनी काँग्रेस अध्यक्ष मलिकार्जुन खरगे आणि सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांना ई-मेल पाठवून आपली नाराजी व्यक्त केली आहे. विधानपरिषद निवडणुकीत शरद पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय स्थानिक नेत्यांशी चर्चा न करता घेण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
पुण्यातील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता निर्णय घेतल्याने पक्षात नाराजीचे वातावरण निर्माण झाल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे. तसेच या प्रकरणाची दखल घेऊन पक्षश्रेष्ठींनी योग्य ती कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

महाविकास आघाडीत काँग्रेसला अपेक्षित महत्त्व मिळत नसल्याचाही मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहे. स्थानिक पातळीवरील नेत्यांच्या मतांना पुरेसे महत्त्व दिले जात नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये असंतोष वाढत असल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

दरम्यान, या सर्व घडामोडींवर भाष्य करण्यासाठी अरविंद शिंदे आज पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत ते आपली भूमिका स्पष्ट करणार असून, काँग्रेसमधील सुरू असलेल्या वादावर अधिक प्रकाश टाकण्याची शक्यता आहे.
पुणे विधानपरिषद निवडणुकीनंतर समोर आलेल्या या घडामोडींमुळे काँग्रेसच्या स्थानिक राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.