राष्ट्रवादी काँग्रेसचा २७ वा वर्धापन दिन; अजित पवारांच्या आठवणींनी कार्यकर्ते भावूक, सुनेत्रा पवारांचे भावनिक आवाहन

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज २७ वा वर्धापन दिन साजरा होत आहे. मात्र यंदाचा वर्धापन दिन पक्षासाठी विशेष भावनिक ठरत आहे. कारण पक्षाचे प्रमुख नेते आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रभावशाली व्यक्तिमत्त्व असलेले अजित पवार यांच्या निधनानंतरचा हा पहिलाच वर्धापन दिन आहे.

अजित पवार यांच्या जाण्याने पक्षासह राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली. त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने महायुतीत सहभाग घेतला होता. पक्षातील फूट, बदलते राजकीय समीकरण आणि त्यानंतर घडलेल्या घटनांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा हा वर्धापन दिन वेगळ्याच वातावरणात साजरा होत आहे.
या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावर भावनिक संदेश प्रसिद्ध केला आहे. त्यांनी अजित पवार यांच्या स्मृतींना अभिवादन करत त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला.

सुनेत्रा पवार यांनी आपल्या संदेशात राष्ट्रवादी काँग्रेसच्या २७ वर्षांच्या प्रवासाचा उल्लेख करत पक्षाला साथ देणाऱ्या नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांचे आभार मानले. शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा जपत अधिक सक्षम आणि प्रगत महाराष्ट्र घडवण्यासाठी नव्या जोमाने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

तसेच, अजित पवार हे केवळ पक्षाचे नेते नव्हते तर कार्यकर्त्यांसाठी आधारवड होते, असे सांगत त्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. सभागृहातील भाषणे, कार्यकर्त्यांचे मेळावे आणि पक्षाचा झेंडा यंदाही तितक्याच अभिमानाने फडकणार असला तरी दादांची उणीव प्रत्येकाला जाणवत राहील, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
अजित पवार यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करत त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांना पूर्ण करण्याचा संकल्प करूया, असे आवाहनही सुनेत्रा पवार यांनी आपल्या संदेशातून केले आहे.