राज्यसभेच्या जागेवर भुजबळांची वर्णी? सुनेत्रा पवारांच्या वक्तव्याने वाढली उत्सुकता


बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याची रिक्त झालेली राज्यसभेची जागा नेमकी कोणाच्या वाट्याला जाणार, याबाबतच्या चर्चांना आता वेग आला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी यावर महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे राज्यसभा उमेदवारीबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे.

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील एक जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी अनेक नावांची चर्चा सुरू असली तरी छगन भुजबळ यांच्या नावाला विशेष महत्त्व मिळत असल्याचे बोलले जात आहे.

बारामती तालुक्यातील काऱ्हाटी गावात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या केळी पिकांची पाहणी करण्यासाठी सुनेत्रा पवार आल्या होत्या. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी राज्यसभा उमेदवारीबाबत भाष्य केले.

“प्रत्येक पक्षाला सर्वांच्या मतांचा आणि विचारांचा आदर ठेवून उमेदवार निश्चित करावा लागतो. सध्या पक्षांतर्गत चर्चा सुरू आहेत. उमेदवार ठरविताना अनेक नावांचा विचार केला जातो. अंतिम निर्णय झाल्यानंतर उद्या संध्याकाळपर्यंत तुम्हाला नाव कळेल,” असे सुनेत्रा पवार यांनी सांगितले.

त्यांच्या या वक्तव्यानंतर छगन भुजबळ यांच्या नावावरील चर्चांना आणखी बळ मिळाले आहे. दरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून छगन भुजबळ यांना राज्यसभेवर पाठविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्याचबरोबर भुजबळ यांच्या जागी माजी खासदार समीर भुजबळ यांना संधी देण्याची मागणीही करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

या घडामोडींमुळे राष्ट्रवादीच्या राज्यसभा उमेदवारीचा निर्णय आता महायुतीच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या चर्चेनंतरच अंतिम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून लवकरच निर्णय कळविण्याचे आश्वासन दिल्याचेही समजते.

याचवेळी सुनेत्रा पवार यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकरी नुकसानीबाबतही चिंता व्यक्त केली. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे बारामती परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे कोसळली असून शेतीचे नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून पंचनामे सुरू असून नुकसानीचा आढावा घेतल्यानंतर शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यसभेच्या जागेसाठी सुरू असलेल्या राजकीय हालचालींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उत्सुकता वाढली असून अंतिम निर्णयाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!