पुण्यात पर्यावरण दिनानिमित्त आनंदवन आणि युथ ट्रान्सफॉर्मेशन फोरमकडून 700 वृक्षांचे रोपण; शालेय विद्यार्थ्यांसह शेकडो नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

पुणे : झपाट्याने वाढणारे शहरीकरण आणि जागतिक तापमानवाढीच्या संकटाचा सामना करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण आणि त्यांचे संवर्धन करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र वन विभागाचे फॉरेस्ट कॉन्झर्व्हेटर आशिष ठाकरे यांनी केले. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी केवळ सरकारी यंत्रणा पुरेशी नसून, व्यापक लोकसहभाग आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘आनंदवन फाऊंडेशन’ आणि ‘युथ ट्रान्सफॉर्मेशन फोरम’ यांच्या संयुक्त विद्यमाने हडपसर-महंमदवाडी परिसरातील आनंदवन फेज-5 (औताडवाडी-हांडेवाडी) आणि न्याती काउंटी येथे भव्य वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी पार पडलेल्या या उपक्रमात तब्बल 700 देशी आणि वनौषधी वृक्षांची लागवड करण्यात आली.
या कार्यक्रमात आनंदवन संस्थेचे प्रवीण कुमार आनंद, रमेश नर्यानी, भूपेश शर्मा तसेच युथ ट्रान्सफॉर्मेशन फोरमचे पदाधिकारी, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, डॉक्टर, विद्यार्थी आणि शेकडो पर्यावरणप्रेमी नागरिक सहभागी झाले होते.

जागतिक तापमानवाढ, वाढता उष्मा आणि दुर्मिळ होत चाललेल्या वनौषधींचे संवर्धन या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात आली. सहभागी नागरिकांनी पर्यावरण संवर्धनाची सामूहिक शपथ घेत वृक्षारोपणात सक्रिय सहभाग नोंदवला.

युथ ट्रान्सफॉर्मेशन फोरमचे अध्यक्ष डॉ. विक्रम गायकवाड यांनी सांगितले की, “हा उपक्रम केवळ वृक्षारोपणापुरता मर्यादित नसून पुढील तीन वर्षे लावलेल्या सर्व वृक्षांचे शास्त्रीय पद्धतीने संवर्धन आणि संरक्षण केले जाणार आहे.”
आनंदवन संस्थेचे विशाल पवार यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेत आनंदवन फेज-1 ते फेज-7 पर्यंत उभारण्यात आलेल्या हरित क्षेत्रांची माहिती दिली. तसेच युथ ट्रान्सफॉर्मेशन फोरमच्या डॉ. सोनल भालेराव यांनी संस्था गेल्या तीन वर्षांपासून कळसुबाई परिसरात यशस्वी वृक्षारोपण आणि संवर्धनाचे कार्य करत असल्याचे सांगितले.
या उपक्रमात दिल्ली पब्लिक स्कूल, अमानोरा स्कूल, रेहान स्कूल, डीपीएस स्कूल आणि ग्रेस स्कूलमधील विद्यार्थी व शिक्षकांनी उत्साहाने सहभाग घेतला. कुदळ आणि फावडे हातात घेत विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.