पेट्रोल 20 रुपयांनी स्वस्त होणार? E85 इथेनॉल इंधनामुळे देशात ऊर्जा क्षेत्रात मोठा बदल

नवी दिल्ली : भारतात इंधन क्षेत्रात मोठा बदल घडताना दिसत असून पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे त्रस्त नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशात E85 इथेनॉल इंधनाची विक्री सुरू झाली असून हे इंधन सामान्य पेट्रोलपेक्षा सुमारे 20 रुपये प्रति लिटर स्वस्त असल्याने त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने (IOCL) देशातील पहिले सार्वजनिक E85 इंधन वितरण केंद्र सुरू केले आहे. सुरुवातीच्या टप्प्यात हे इंधन दिल्ली-एनसीआर, मुंबई, पुणे आणि नागपूरसह सुमारे 50 पेट्रोल पंपांवर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
E85 हे प्रगत इथेनॉल मिश्रित इंधन असून त्यामध्ये 80 ते 85 टक्के इथेनॉल आणि उर्वरित पेट्रोलचे मिश्रण असते. सध्या भारतात बहुतांश वाहनांमध्ये E20 इंधन वापरले जाते, मात्र E85 अधिक पर्यावरणपूरक आणि इंधन-कार्यक्षम मानले जात आहे. हे इंधन विशेषतः फ्लेक्स-फ्युएल वाहनांसाठी (Flex Fuel Vehicles) तयार करण्यात आले आहे, जी पेट्रोल आणि उच्च इथेनॉल मिश्रणावर सहज चालू शकतात.

सध्याच्या दरांनुसार दिल्लीमध्ये सामान्य पेट्रोलची किंमत सुमारे 102.12 रुपये प्रति लिटर आहे, तर E85 इंधन 82.12 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे. त्यामुळे प्रत्येक लिटरमागे सुमारे 20 रुपयांची बचत होऊ शकते. उदाहरणार्थ, जर एखादा वाहनचालक महिन्याला 50 लिटर इंधन वापरत असेल, तर त्याला सुमारे 1000 रुपयांची बचत मिळू शकते.

मात्र, हे इंधन सध्या सर्वसामान्य पेट्रोल किंवा डिझेल वाहनांमध्ये वापरता येत नाही. फक्त फ्लेक्स-फ्युएल वाहनांमध्येच याचा वापर शक्य आहे. त्यामुळे वाहन उत्पादक कंपन्या अशा इंजिन तंत्रज्ञानावर मोठ्या प्रमाणात काम करत आहेत. भविष्यात अशा वाहनांची संख्या वाढल्यास E85 चा वापरही मोठ्या प्रमाणात वाढू शकतो.
भारत सध्या आपल्या गरजेपैकी सुमारे 85 टक्के कच्चे तेल आयात करतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील दरवाढ, युद्धजन्य परिस्थिती आणि पुरवठा साखळीतील अडथळ्यांचा थेट परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होतो. यावर उपाय म्हणून सरकार इथेनॉलसारख्या पर्यायी इंधनाला प्रोत्साहन देत आहे.
इथेनॉल देशातच ऊस, मका आणि इतर कृषी उत्पादनांपासून तयार केले जाते. त्यामुळे यामुळे केवळ ऊर्जा स्वावलंबन वाढणार नाही तर शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी अधिक बाजारपेठ मिळणार आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही याचा मोठा फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तज्ज्ञांच्या मते, E85 सारख्या इंधनाचा विस्तार झाल्यास भविष्यात भारताची इंधन आयातीवरील अवलंबित्व कमी होऊ शकते आणि ऊर्जा क्षेत्रात मोठी क्रांती घडू शकते.