पत्नीच्या डायरीतील रहस्य उघडलं अन् आयुष्य संपवलं! लग्नाच्या अवघ्या 12 दिवसांत तलाठ्याची आत्महत्या; बीडमधील घटनेने खळबळ


बीड : लग्नाच्या अवघ्या बारा दिवसांनंतर एका तरुण तलाठ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, या प्रकरणाने बीडसह संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. पत्नीच्या वागणुकीमुळे मानसिक धक्का बसल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला असून, मृत तरुणाच्या आईच्या तक्रारीवरून पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील नांदुर्गा येथील गणेश दत्तू कोळी (वय 26) हे चंद्रपूर येथे तलाठी म्हणून कार्यरत होते. यापूर्वी ते राज्य राखीव पोलिस दलात पोलिस शिपाई म्हणून कार्यरत होते. स्पर्धा परीक्षेत यश मिळवत त्यांनी तलाठी पद मिळवले होते. 13 मे 2026 रोजी त्यांचा विवाह बीड येथील एका तरुणीसोबत झाला होता. पत्नीदेखील शासकीय सेवेत कार्यरत असल्याची माहिती आहे.

लग्नानंतर नवदाम्पत्य कर्नाटक येथे देवदर्शनासाठी गेले होते. या प्रवासादरम्यान पत्नीला आलेल्या एका फोन कॉलमुळे गणेश यांच्या मनात संशय निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. याबाबत विचारणा केल्यावर पत्नीने उत्तर देण्यास नकार दिल्याचेही कुटुंबीयांचे म्हणणे आहे. त्यानंतर घरात सत्यनारायणाची पूजा पार पडली; मात्र गणेश यांची मानसिक अवस्था बदललेली दिसत होती.

दरम्यान, पत्नी माहेरी गेल्यानंतर गणेश यांनी तिची डायरी वाचल्याचा दावा केला जात आहे. त्या डायरीमध्ये पत्नीचे दुसऱ्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याचा उल्लेख असल्याचे गणेश यांनी आपल्या बहिणीला फोनवर सांगितले होते. “माझी मोठी फसवणूक झाली आहे,” अशी खंत त्यांनी व्यक्त केल्याचे समोर आले आहे. या मुद्द्यावरून दोघांमध्ये वादही झाल्याचे सांगितले जाते.

25 मे रोजी सकाळी बहिणीसोबत झालेल्या संभाषणानंतर काही तासांतच गणेश यांनी अंबाजोगाई येथे पत्नी राहत असलेल्या खोलीत गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

याप्रकरणी आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. गणेश यांच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, सूनबाईने फोनवर “हे लग्न माझ्या इच्छेविरुद्ध झाले असून मला गणेशसोबत संसार करायचा नाही,” असे स्पष्ट सांगितले होते. तसेच ती सतत मोबाईल लॉक ठेवून कोणाशीतरी संपर्कात असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

घटनेनंतर अंबाजोगाई पोलिसांनी तपास सुरू केला असून, आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा मुद्दा तपासाच्या केंद्रस्थानी आहे. मृताच्या कुटुंबीयांनी न्यायाची मागणी केली असून, या प्रकरणातील सत्य तपासातून समोर येणार आहे. सध्या या घटनेची परिसरात मोठी चर्चा सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!