छत्रपती शिवाजी महाराज हे स्वाभिमान आणि सुशासनाचा आदर्श; पुणे जिल्हा परिषदेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न…


पुणे : छत्रपती शिवाजी महाराज हे स्वाभिमान, लोककल्याण आणि सुशासनाचा आदर्श असून त्यांचे विचार आजही समाजाला दिशा देणारे आहेत. समाजात एकोपा, बंधुता, सामाजिक न्याय आणि विकासाची भावना रुजविण्यासाठी शिवरायांच्या विचारांचे स्मरण आणि आचरण आवश्यक असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले.

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त पुणे जिल्हा परिषदेत आयोजित कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून स्वराज्य गुढी उभारल्यानंतर त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष विरधवल जगदाळे,मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील,उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सुनेत्रा पवार म्हणाल्या,६ जून १६७४ रोजी रायगडाच्या पवित्र भूमीवर झालेला शिवराज्याभिषेक हा केवळ एका राजाचा राज्याभिषेक नसून स्वाभिमान, स्वातंत्र्य आणि लोककल्याणकारी राज्यव्यवस्थेचा विजय होता. पुणे जिल्हा परिषदेने शिवस्वराज्य दिनाची संकल्पना प्रथम राबविल्याचा उल्लेख करत त्यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. ज्या पुण्यभूमीत राजमाता जिजाऊंनी बाल शिवबांच्या मनात स्वराज्याची बीजे रुजवली, त्याच पुण्यातून सुरू झालेली ही संकल्पना राज्यभर पोहोचल्याचा अभिमान असल्याचे त्यांनी नमूद केले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती, धर्म, पंथ आणि समाजघटकांना सोबत घेऊन स्वराज्याची उभारणी केली. त्यांच्या राज्यात समान न्याय, सुरक्षितता, लोककल्याण आणि प्रशासनातील पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य होते. महिलांचा सन्मान, शेतकऱ्यांचे संरक्षण, दुर्बल घटकांचे हित आणि सर्वसामान्यांच्या कल्याणाची भूमिका ही त्यांच्या राज्यकारभाराची वैशिष्ट्ये होती, असे त्यांनी सांगितले.

महाराज हे केवळ पराक्रमी योद्धे नव्हते, तर दूरदृष्टीचे प्रशासक, कुशल संघटक आणि लोकहितदक्ष राजे होते. त्यांनी महाराष्ट्राला स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा दिली, अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचे बळ दिले आणि संकटांवर मात करण्याचा आत्मविश्वास दिला. आजच्या काळातही त्यांचे विचार तितकेच मार्गदर्शक असल्याचे श्रीमती पवार यांनी नमूद केले.

राज्यातील सर्व जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींमध्ये शिवस्वराज्य गुढी उभारून शिवरायांच्या विचारांप्रती निष्ठा व्यक्त करण्यात येत असल्याचे सांगून ही गुढी स्वाभिमान, राष्ट्रप्रेम, कर्तव्यनिष्ठा आणि लोककल्याणाच्या विचारांची पताका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालण्याचा, समाजहितासाठी कार्य करण्याचा आणि महाराष्ट्राला अधिक सक्षम, समृद्ध व प्रगत बनविण्याचा संकल्प करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

प्रारंभी जिल्हा परिषदेतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनाही अभिवादन केले.

कार्यक्रमानंतर उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या समोर जिल्हा परिषदेच्या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेला शासनाकडून सर्वोत्तोपरी सहकार्य केले जाईल असे श्रीमती पवार यांनी सांगितले.

यावेळी सभापती समाज कल्याण समिती जितेंद्र बडेकर,सभापती कृषी व पशुसंवर्धन समिती अमोल नलावडे, सभापती बांधकाम व आरोग्य समिती दिपाली होलावळे, अपर मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांच्या सह अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!