पुण्यात राष्ट्रवादीत ‘बंडाचा भडका’! विक्रम काकडेंच्या उमेदवारीने निष्ठावंत संतप्त; राजीनामे, बंडखोरी आणि सुनेत्रा-पार्थ पवारांसमोर मोठं आव्हान

पुणे : विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. पक्षात नुकताच प्रवेश केलेल्या विक्रम काकडे यांना उमेदवारी जाहीर होताच निष्ठावंत पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी उसळली असून राजीनामे, बंडखोरी आणि उघड विरोधामुळे पक्ष नेतृत्वाची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच राष्ट्रवादीतील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे.

महायुतीच्या जागावाटपात पुणे आणि रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग या दोन जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आल्या. कोकणातून अनिकेत तटकरे यांची उमेदवारी जवळपास निर्विवाद मानली जात असताना पुण्याच्या जागेवर मात्र शेवटच्या क्षणापर्यंत जोरदार रस्सीखेच सुरू होती. अनेक इच्छुक नेते उमेदवारीसाठी प्रयत्नशील होते. त्यामुळे अंतिम निर्णयाकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील उमेदवार निश्चित करण्यासाठी सकाळपासून जिजाई बंगल्यावर महत्त्वपूर्ण बैठका पार पडल्या. पक्षाध्यक्षा सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी अनेक पदाधिकारी व इच्छुकांशी चर्चा केली. मात्र दिवसभर चाललेल्या चर्चेनंतर ऐनवेळी पक्षात दाखल झालेल्या विक्रम काकडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. याच निर्णयानंतर नाराजीचा स्फोट झाला.

काकडे यांच्या उमेदवारीला सुरुवातीपासूनच काही पदाधिकाऱ्यांचा विरोध असल्याची चर्चा होती. अखेर उमेदवारी जाहीर होताच पर्वती विधानसभा मतदारसंघाचे कार्याध्यक्ष रामदास गाडे यांनी पदाचा राजीनामा देत नाराजी उघडपणे व्यक्त केली. त्यांच्या निर्णयामुळे पक्षातील असंतोष अधिक स्पष्टपणे समोर आला आहे.

दुसरीकडे पुणे शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांनीही या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. उमेदवारी प्रक्रियेत निष्ठावंतांना डावलण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुण्यात राष्ट्रवादीसमोर बंडखोरीचे संकट उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या वादात आता पक्षाचे राज्य उपाध्यक्ष सुरेश घोले यांनीही उडी घेतली आहे. पक्षासाठी अनेक वर्षे काम करूनही वरिष्ठ कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. गेली अनेक दशके पक्षासाठी काम केले, विविध संस्थांचे नेतृत्व केले, तरीही उमेदवारीच्या शर्यतीत आपल्याला संधी मिळाली नाही, अशी नाराजी त्यांनी जाहीरपणे बोलून दाखवली.
दरम्यान, पुण्यातील या घडामोडींमुळे सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्यासमोर मोठे संघटनात्मक आव्हान उभे राहिले आहे. निवडणुकीच्या तोंडावर नाराज गटांची समजूत काढण्यात नेतृत्वाला यश येते की नाराजीचे रूपांतर बंडखोरीत होते, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
विधान परिषद निवडणुकीत महायुती एकसंघ असल्याचा दावा केला जात असला तरी पुण्यातील राष्ट्रवादीतील नाराजीमुळे राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उमेदवारीच्या निर्णयामुळे निर्माण झालेला हा वाद आगामी काही दिवसांत आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत असून, पुण्याची लढत आता केवळ विरोधकांविरुद्ध नसून पक्षांतर्गत असंतोषाविरुद्धही ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.